परंपरेला फाटा देत पत्नीने केले पतीवर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

देवगाव रंगारी - मूलबाळ नसल्याने पारंपरिक रूढी, परंपरेला फाटा देत पतीच्या इच्छेनुसार पत्नीने पतीवर अंत्यसंस्कार केले. ही घटना देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथे शुक्रवारी (ता.१२) रात्री घडली.

देवगाव रंगारी - मूलबाळ नसल्याने पारंपरिक रूढी, परंपरेला फाटा देत पतीच्या इच्छेनुसार पत्नीने पतीवर अंत्यसंस्कार केले. ही घटना देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथे शुक्रवारी (ता.१२) रात्री घडली.

येथील पोलिस ठाण्याच्या बाजूला माजी ग्रामपंचायत सदस्य गोकुळ जयराम डोंगरे (वय ६५) हे पत्नी मालनबाईसह राहत असत. चप्पल, बूट बनविणारे कुशल कारागीर म्हणून गोकुळ डोंगरे हे ओळखले जात. बसस्थानकाजवळ अनेक वर्षे त्यांचे चप्पल, बुटांचे दुकान होते. या दांपत्यास मूलबाळ नाही. घरात दोघेच असल्यामुळे ते एकमेकांना खूप जीव लावत असत. सुख-दुःखात त्यांचाच एकमेकांना आधार असायचा. गोकुळ डोंगरे यांचे शुक्रवारी (ता. १२) पहाटे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. अचानक घडलेल्या घटनेने मालनबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. दिवसभरात नातेवाईक, आप्तेष्टांसह ग्रामस्थ जमा झाले. या दांपत्यास मूलबाळ नसल्याने अंत्यसंस्कार कोण करणार, असा प्रश्‍न नातेवाइकांना पडला. गोकुळ डोंगरे हे हयात असताना पत्नीला नेहमी म्हणायचे, की आपल्या दोघांपैकी ज्याचा आधी मृत्यू होईल, त्याच्यावर हयात असलेल्याने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करावेत. मालनबाई यांनी पतीची ही इच्छा सर्वांना बोलून दाखविली. सर्व धीर एकवटून, परंपरेला फाटा देत पतीवर विधिवत अंत्यसंस्कार केले.

आधुनिक सावित्रीबाई
अठराव्या शतकात सावित्रीबाई फुले यांनी पती महात्मा फुले यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. आजच्या काळात देवगाव रंगारीसारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मालनबाई यांनी पती गोकुळ डोंगरे यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या दोन्ही घटनांचा काळ आणि संदर्भ वेगळे असले, तरी सुधारणा हाच त्यामागचा समान धागा आहे. त्याची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.

आज देवगाव रंगारी येथील मालनबाई गोकुळ डोंगरे यांनी परंपरेला फाटा देत आपल्या पतीचा अंत्यसंस्कार विधी मुलाप्रमाणे पार पाडला. ही घटना सर्व समाजासाठी एक चांगले उदाहरण आहे. समाजात असलेल्या काही अनिष्ट रूढी-परंपरा या काळानुसार बदलायला हव्यात. 
- लक्ष्मण गरोठे, अध्यक्ष, संत शिरोमणी गुरू रविदास संस्थान, वेरूळ, ता. खुलताबाद.

Web Title: Gokul Dongare Funeral