सोनेरी महलजवळ होणार भव्य पुराणवस्तू संग्रहालय!

संकेत कुलकर्णी
शुक्रवार, 11 मे 2018

औरंगाबाद - गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक सोनेरी महललगत भव्य प्रादेशिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित इमारतीसाठी राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने वास्तुविशारदांकडून सात जूनपर्यंत सुयोग्य नकाशे, आराखडे मागवले आहेत.

औरंगाबाद - गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक सोनेरी महललगत भव्य प्रादेशिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित इमारतीसाठी राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने वास्तुविशारदांकडून सात जूनपर्यंत सुयोग्य नकाशे, आराखडे मागवले आहेत.

राज्य पुरातत्त्व विभागाचे सोनेरी महलाच्या तळमजल्यावरील दालनांमध्ये सध्या वस्तुसंग्रहालय आहे. यात मौल्यवान चित्रे, मूर्ती, भांडी, नाणी, शस्त्रे, तोफा, शिलालेख आणि ताम्रपट आहेत. तसेच पैठण आणि तेर (जि. उस्मानाबाद) येथेही अपुऱ्या जागेत का होईना, पण अनमोल वस्तुसंग्रहालये आहेत. त्याखेरीज वेळोवेळी उत्खननांतून निघालेल्या अनेक पुराणवस्तू आणि शिल्पे अपुऱ्या जागेअभावी प्रदर्शित करता येत नाहीत. त्यामुळे मराठवाड्याच्या राजधानीत एक मोठे प्रादेशिक संग्रहालय असावे, असा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी बनवण्यात आला होता. त्यासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून ९९ वर्षांच्या करारावर सहा एकर जागा मिळाली. त्यासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी विशेष तरतूदही केली जाते; पण काही ना काही कारणांनी हे घोंगडे भिजत पडते.

आता पुन्हा डोंगराच्या कुशीत असलेल्या या जागेवर संग्रहालयाची इमारत बांधण्यासाठी विभागाने उचल खाल्ली असून, संग्रहालयासाठी आवश्‍यक सोयींसह समर्पक नकाशे आणि आराखडे सादर करण्याचे आवाहन वास्तुविशारदांना करण्यात आले आहे. हे आराखडे सादर करण्यासाठी सात जूनपर्यंतची मुदत देण्यात आली असून, त्यातील सर्वोत्तम आराखडा निवडून त्याचे अंदाजपत्रक बनवले जाईल, असे सहायक संचालक अजित खंदारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

मराठवाडाभरातील महत्त्वाच्या पुराणवस्तूंना एका छताखाली आणता येईल, असे भव्य संग्रहालय उभारण्याचे आम्ही नियोजन करत आहोत. या प्रदेशाला भूषण वाटेल असे हे संग्रहालय लवकरात लवकर उभे राहील, असा विभागाचा प्रयत्न आहे.
- अजित खंदारे, सहायक संचालक, राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय.

Web Title: Golden Mahal Musium