SUNDAY SPECIAL : ...अन्‌ कॅनॉटवरचा पुतळा बोलू लागला!, पाहा VIDEO

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

  • उपजीविकेसाठी तरुणाची शक्कल
  • सेल्फीसाठी चिमुकल्यांची गर्दी 

औरंगाबाद : सिडकोतील कॅनॉट गार्डन परिसरात आईबाबांसोबत फिरायला आलेल्या चिमुकल्यांची एका सोनेरी पुतळ्याभोवती दररोज रात्री गर्दी होते. ते या पुतळ्यासोबत सेल्फी काढतात, हस्तांदोलन करतात, जमलेले आईबाबा स्वखुशीने पुतळ्याला बक्षिसीही देतात. उपजीविकेसाठी उदगीरच्या एका तरुणाने लढवलेली ही शक्कल चांगलीच प्रसिद्ध होत आहे. 

त्याचं नाव आकाश कुंभार. जेमतेम बारावी पास हा तरुण उपजीविकेसाठी लातूर जिल्ह्यातल्या उदगीरहून शहरात आला. प्रोझोन मॉलमधील एका कपड्यांच्या शोरूममध्ये कामाला असलेल्या आकाशने यूट्युबवर परदेशातील काही व्हिडिओ पाहिले आणि त्याला "गोल्डन स्टॅच्यू'ची कल्पना सुचली. त्याने स्वतःच्या मापाचा सोनेरी सूट शिवून घेतला. सोनेरी मुखवटा आणला. नोकरीतून सुटला, की या वेशात सोनेरी हॅट घालून, हातात काठी आणि तलवार घेऊन तो रोज रात्री कॅनॉट परिसरात सोनेरी स्टुलावर उभा राहतो. या परिसरात आऊटिंगसाठी येणाऱ्या कुटुंबांतील लहानग्यांचे लक्ष तो हमखास वेधतो. 

आईबाबांकडे हट्ट करून ही मुले या पुतळ्यासोबत सेल्फी काढतात. त्याबदल्यात आकाशला बक्षिसी मिळते. रात्री दोन-तीन तास इथे उभा राहून दररोज 200 ते 300 रुपयांची कमाई होते. लोकांनी काढलेले फोटो, व्हिडिओ तो आपल्या टिक-टॉक अकाउंटवर शेअर करतो. मात्र, त्यासाठी कोंदट कपड्यांत मुखवट्याआड घामेजलेल्या अवस्थेत राहणे तितके सोपे नसल्याचेही आकाश सांगतो. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य आणि आपली गरज, यासाठी हे सहन करणे सुसह्य होते, असेही तो म्हणतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden Statue in Aurangabad