गोंदेगाव येथील शाळेचा निकाल शून्य टक्के

संदीप लांडगे
शनिवार, 8 जून 2019

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील परीक्षा केंद्रात मास कॉपी प्रकरण घडले होते.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील परीक्षा केंद्रात मास कॉपी प्रकरण घडले होते. या प्रकरणातील दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या शाळेचा संपूर्ण निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. 

राज्य शिक्षण मंडळातर्फे 1 ते 22 मार्च दरम्यान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान अकरा मार्चला गणित- भाग एक या पेपरवेळी शिक्षणाधिकारी (माध्य) जि. प. औरंगाबाद यांच्या भरारी पथकाने संबंधित परीक्षा केंद्रास भेट दिली असता परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार चालू असल्याचे निदर्शनास आले होते. त्या ठिकाणी असलेल्या 13 केंद्रावरील 321 विद्यार्थी सामुदायिक कॉपी करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भरारी पथकामार्फत 13 पर्यवेक्षक, 2 कर्मचारी व केंद्र संचालक अशा 16 जणांवर कारवाई करुन चौकशी समिती गठीत केली होती. याबाबत एस.बी. संस्थेला दोषींवर कार्यवाही करण्याची सूचना बोर्डामार्फत देण्यात आली होती.

गैरप्रकारात सहभागी असलेल्या पर्यवेक्षकांची विभागीय मंडळातर्फे चौकशी चालू आहे. तसेच परीक्षा केंद्रावरील गैरप्रकारामुळे आपले परीक्षा केंद्र आगामी परीक्षेपासून बंद का करण्यात येऊ नये? याबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून सदरील परीक्षा केंद्रानी सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याबाबत संबंधित परीक्षा केंद्रास कळविण्यात आले होते. परीक्षा केंद्र बद करण्याबाबत आगामी काळात निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोर्डातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

चौकशीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग) जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठित करण्यात आली आहे. शिक्षकांचे नियुक्तिपत्र, ते शिक्षक शिकवीत असलेले विषय या बाबींविषयक संपूर्ण माहिती शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी मागिवली होती. या बाबतीतील खुलासे मंडळात मुख्याध्यापकांनी सादर केले असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. 

शाळेचा निकाल शून्य टक्के ः 
मास कॉपी प्रकरणामुळे गोंदेगाव येथील सरस्वती भुवन शाळा केंद्रावरील 321 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. मास कॉपीमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची 14, 15 व 17 जूनला बोर्डामार्फत चौकशी केली जाणार आहे. दरम्यान यंदा गोंदेगाव येथील सरस्वती भुवन शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondegaon school results is zero percent