दिवसा वैचारिक मंथन...रात्री व्याख्यान, भजन आणि किर्तन; ठिय्या आंदोलनाला मिळतोय प्रतिसाद

आनंद इंदानी
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

आंदोलनात दिवसभर विविध आरक्षणाच्या मुद्यावर विचार मंथन घडत आहे. आंदोलनाला भेट देणारे वक्ते देखील मराठा आरक्षणाचा दिशा, नियोजन व शासनाची भूमिका या विषयावर आपली भूमिका मांडत आहे.

बदनापूर (जि. जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बदनापूर तहसिल कार्यालयावर मागील तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सकल मराठा समाज बांधवांसह विविध सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. आंदोलनात दिवसभर विविध आरक्षणाच्या मुद्यावर विचार मंथन घडत आहे. आंदोलनाला भेट देणारे वक्ते देखील मराठा आरक्षणाचा दिशा, नियोजन व शासनाची भूमिका या विषयावर आपली भूमिका मांडत आहे.

आंदोलनस्थळी दिवसा विचारांची देवाण - घेवाण होत असताना रात्री देखिल मुक्कामाला थांबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी खास व्याख्यान, भजन, जागरनाच्या काइयकर्माचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री उशिरा पर्यंत असे कार्यक्रम होत असल्यामुळे समाजाचे देणे लागतो अशा भावनेतून रात्री थांबणाऱ्या कारकर्त्यांना यामुळे  आणखी ऊर्जा मिळत आहे. 

मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे, त्या पद्धतीने नियोजन सुरू झाले आहे. आंदोलनस्थळी समितीच्या कार्यकर्त्यांसह नेमून दिलेल्या गावातील समाज बांधव तेथे चोविस तास ठिय्या मांडत आहेत.

संजय भोर यांनी दिली भेट -
मराठा क्रांती ठोक मोर्च्याचे राज्य समन्वक तथा शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजय भोर यांनी बदनापूर येथे आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाचा लढा निर्धारित टप्य्यावर आहे. त्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. मराठा मोर्चाच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह इतर १९ मागण्या शासनापर्यंत पोचलेल्या आहेत. त्यामुळे यावर शासनाशी चर्चा करण्याची गरज नाही. शासनाने वेळकाढू धोरण न अवलंबविता आरक्षणाचा तातडीने निर्णय घ्यावा. आरक्षणासाठी आपण निकराचा लढा देऊ मात्र कुणीही आत्महत्या करू नये, असे आवाहन देखिल त्यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत प्रशांत इंगळे, निलेश मदन उपस्थित होते.

दरम्यान, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी बदनापूर तालुका ग्रामसेवक संघटना, जय भगवान महासंघ आदी संघटनांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दर्शवला. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Good Response to tthiyaa agitation at jalna