सरकारी बातमीदार निवडणुकीपुरते बाहेर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

सरकारच्या योजना, कार्यक्रमांच्या बातम्यांचे ओझे खांद्यावर असलेले सरकारी बातमीदार म्हणजेच काही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीपुरतेच त्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. निवडणूक संपल्यानंतर मात्र ते पुन्हा पहिल्या ठिकाणीच परत येणार आहेत.

लातूर ः सरकारच्या योजना, कार्यक्रमांच्या बातम्यांचे ओझे खांद्यावर असलेले सरकारी बातमीदार म्हणजेच काही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीपुरतेच त्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. निवडणूक संपल्यानंतर मात्र ते पुन्हा पहिल्या ठिकाणीच परत येणार आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या कामाशी प्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी स्वतःच्या जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या अथवा ता. 31 ऑक्‍टोबर 2019 पूर्वी एकाच जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या तसेच मागील चार वर्षे एकाच जिल्ह्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी, असे आदेश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

त्यामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विधानसभा निवडणूक कालावधीपुरत्या बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

यातून लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांची सोलापूरला, उस्मानाबादचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची लातूरला, वर्ध्याच्या जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांची भंडारा, भंडारा येथील जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांची वर्धा, हिंगोलीचे जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांची उस्मानाबादला, तर सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांची हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे. निवडणूक संपल्यानंतर हे अधिकारी पुन्हा आपल्या मूळ जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government correspondent out till election