शासनकर्त्यांच्या कारस्थानाचे शेतकरी बळी : रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

हुतात्मांना अभिवादन शेतकरी जागर यात्रेच्या 29 दिवसाच्या प्रवासाची माहिती दिली. 23 मार्चला सांगलीतून सुरू झालेल्या यात्रेने बेळगावसह विदर्भ मिळून जवळपास 26 जिल्ह्यांचा प्रवास केला.

- किशोर ढमाले, सत्यशोधक शेतकरी सभा

औरंगाबाद : देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांकडूनच शेतकरी विरोधी धोरणं अवलंबिली गेली आहेत. या सर्व शासनकर्त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या कारस्थानाचे बळी शेतकरी ठरत आहे, अशी टीका शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी (ता.20) पत्रकार परिषदेत केली. 
शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा शुक्रवारी जिल्ह्यात दाखल झाली. 

या जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड,गंगापुरख पैठण,खुलताबाद या तालुक्‍यात सभा झाल्या. यासह शहरातील विविध हुतात्मा स्थळांना भेटी देऊन अभिवादन करण्यात आले. रघुनाथदादा पाटील म्हणाले, सरकारने दुधाच्या दरात हमी दर जाहीर करूनही मिळाला नाही. आम्ही शासनकर्त्यांची भेट घेतली. तोपर्यंत केवळ दुध उत्पादकांची प्रतिदिन 21 कोटी प्रमाणे 210 दिवसात 4200 कोटीने लूट केली होती. पाचशे लाख कोटीने शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारकडून संपूर्ण कर्जमाफी देतांना हात का आखडला जात आहे. चार लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या. हमी दरासंदर्भातील आकडे या आत्महत्येत आताचे सत्ताधारी व विरोधक दोघांचीही शासनकर्ते म्हणून घेतलेली धोरणं कारणीभूत आहे. 

घटनेतील तरतुदीनुसार हमी दरासंदर्भात ट्रायब्युनल नेमायची व्यवस्था आहे. मग आजवरच्या व आताचे सरकारांनी तस का केलं नाही, असा प्रश्‍नही उपस्थित केला,तर उत्तर मिळत नाही. काही लोकांना शासनात घेतलं म्हणजे ते ज्या घटकासाठी लढले त्यांचे प्रश्‍न सुटले का. मुळात ही शासनकर्ते दडपण्यासाठीची नीती अवलंबत आहे. 

अन्यथा जेलभरो आंदोलन : ढमाले 

सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले म्हणाले, हुतात्मांना अभिवादन शेतकरी जागर यात्रेच्या 29 दिवसाच्या प्रवासाची माहिती दिली. 23 मार्चला सांगलीतून सुरू झालेल्या यात्रेने बेळगावसह विदर्भ मिळून जवळपास 26 जिल्ह्यांचा प्रवास केला.अकरा वाहन आणि 40 ते 50 कार्यकर्ते गावखेड्यात जाऊन शासनकर्त्यांच्या शेतकरी, कष्टकरी, कामगारांविरोधातील धोरणांविषयी जागर करण्याचे काम करत आहेत.

27 एप्रिलला या यात्रेचा समारोप होणार आहे. 14 मेला मागण्यांच्या पूर्ततेसाठी जेलभरो आंदोलन केले जाईल, त्याची तयारी सुरू आहे. यावेळी सुभाष लोमटे, कालिदास आपेट, ऍड. लक्ष्‌मण प्रधान,देविदास किर्तीशाही, कॉम्रेड मनोहर टाकसाळ, निवृत्त सुभेदार मेजर सुखदेव बन,अण्णा खंदारे, बुद्धप्रिय कबीर,अंकुशराव देशमुख, सुभाश कापुस्ते उपस्थित होते.

Web Title: Government Farmers are affected says Raghunath Patil