शासनाच्या एलईडी बल्बची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

एलईडी बल्बचे वितरण करण्याची सुविधा एजन्सीमार्फत सुरू आहे. मध्यंतरी बल्बचा तुटवडा होता. लवकरच ग्राहकांपर्यंत ही सुविधा पुरविण्यात येईल.

- सुनीलकुमार, प्रकल्प अभियंता, ईईएसएल.

उमरगा - सर्वसामान्य ग्राहकांना कमी दरात एल.ई.डी. बल्ब देण्याची योजना केंद्र सरकारने संबंधित एजन्सीमार्फत सुरू करून सहा महिने झाले तरी उमरगा शहर व तालुक्‍यात ही योजना अद्यापही सुरू झाली नाही. 

विजेची बचत होण्यासाठी एलईडी बल्ब उपयुक्‍त ठरणारे माध्यम आहे. खासगी विक्रेत्यांकडे असलेली बल्बची किंमत सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी नाही. मध्यंतरी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने एलईडी बल्ब ८५ रुपयात देण्याची अभिनव योजना सुरू केली. उस्मानाबादेत या योजनेचा थाटात शुभारंभही झाला होता. मात्र उमरगा शहर व ग्रामीण भागात या योजनेची सुरवात झाली नाही. ‘महावितरण’च्या कार्यालयात बल्बच्या मागणीसाठी ग्राहकांचा ओघ वाढला आहे. रोख रक्‍कमेत ८५ रुपयात तर वीज बिलातून कपात करून घेण्यासाठी बल्बची किंमत ९० रुपये आहे. दहा रुपये भरले तर उर्वरित रक्‍कम बिलाद्वारे घेतली जाते, मात्र संबंधित एजन्सीने बल्ब विक्रीचे स्टॉलच सुरू केले नाहीत. शहरात एका कंपनीच्या दुकानात ही योजना सुरू असल्याची माहिती सांगण्यात आली, मात्र बहुतांश ग्राहकांना याची माहितीच नाही. सद्यःस्थितीत एलईडी बल्ब मिळण्याची सुविधा शहर व तालुक्‍यात कोठेही नाही. एकीकडे विजेच्या वाढलेल्या दराने ग्राहकांना बिलाची रक्‍कम अधिक मोजावी लागते.

कमी दरातील एलईडी बल्ब हजारो ग्राहकांना उपलब्ध झाले तर बिलाची रक्‍कम कमी होण्यास मदत होऊ शकते. परंतु बल्ब मिळत नसल्याने हजारो ग्राहकांना याचा फटका बसू लागला आहे. तर दुसरीकडे खासगी विक्रेत्यांचा एलईडी बल्ब विक्रीचा व्यवसाय मात्र जोरात सुरू आहे. महावितरणचे पीआरओ श्री. दिवटे यांनी काही तांत्रिक कारणामुळे ही सुविधा बंद असली तरी लवकरच ती शहरी व ग्रामीण भागात सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली.

Web Title: Government of LED bulb wait