सरकारने पाच वर्षांत कर्ज केले दुप्पट - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

बुरूज ढासळल्याने किल्ला पडत नसतो - डॉ. कोल्हे
राष्ट्रवादीतील काही जण पक्ष सोडून गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘‘बुरुज ढासळल्याने किल्ला पडत नसतो. पानगळ झाल्यावरच नवी पालवी फुटत असते. पारदर्शी सरकार म्हणून सत्तेत आलेल्या सरकारने जनतेची दिशाभूल केली. आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. बाजार गप्पांवर विश्वास न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा.’’ यावेळी तरुणांनी मोठ्या संख्येने डॉ. कोल्हे यांच्यासोबत छायाचित्र घेण्यासाठी त्यांना गराडा घातला.

गंगापूर - ‘राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून, सामान्य माणूस हतबल झाला आहे. राज्यावर पन्नास वर्षांत जेवढे कर्ज झाले त्यापेक्षा दुप्पट कर्ज पाच वर्षांत भाजप सरकारने करून ठेवले आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त बुधवारी (ता. सात) आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, अभय पाटील चिकटगावकर, विक्रम काळे, शिवाजी बनकर, छाया जंगले, कुंडलिकराव माने, सूरज चव्हाण, किशोर पाटील, पोपटराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 
कायगाव (ता. गंगापूर) येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

अजित पवार म्हणाले, ‘‘सध्या सर्वत्र भ्रष्टाचार वाढला आहे. काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत आल्यास स्थानिकांना कंपन्यांत ७५ टक्के जागा देण्यासाठी लगेच कायदा करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दुष्काळी परिस्थिती हाताळली. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणताच जिव्हाळा नाही. शेतमालाला हमीभाव नाही. सरकारमध्ये असताना शिवसेना मुंबईला आंदोलन करीत होती. आमच्या सत्ताकाळात आम्ही आंदोलने केली नाहीत, तर निर्णय घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला कशाला पिवळी आणि हिरवी यादी हवी? तिथे काय सिग्नल द्यायचा आहे का? आमच्या काळात शरद पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी दिली.’’ जिल्हाध्यक्ष कैलास पाटील म्हणाले, ‘‘स्थानिक आमदार प्रशांत बंब यांनी पाच वर्षे उलटून गेल्यानंतरही कारखाना सुरू केला नाही; तसेच टेंभापुरी धरणात पाणी आणतो, असे त्यांनी सांगितले होते; मात्र त्यातही ते अपयशी ठरले आहेत.’’

संयोजक तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, खुलताबादचे विलास चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संभाजी ब्रिगेडतर्फे आगामी सर्वच निवडणुकांत जाहीर पाठिंबा देण्यात आला. धनगर समाजातर्फे रावसाहेब तोगे यांनी घोंगडी देऊन सत्कार केला. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Loan Double Ajit Pawar Shivswarajya Yatra Politics