'आता दंगल सरकारविरुद्ध शेतकऱ्यांची'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या अत्यंत चिंताजनक असूनही राज्य शासनाला पाझर फुटत नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येईल? असा प्रश्‍न उपस्थित करत आमदार बच्चू कडू यांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली. आमदार कडू यांच्या नेतृत्वात नागपूरहून निघालेली आसूड यात्रा गुरुवारी (ता.13) नांदेड व परभणी जिल्ह्यात होती. शेतकरी विरुद्ध सरकार अशी नवीन दंगल सुरू करून आम्ही शेतकऱ्यांना हिंमत देण्याचे काम करत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापासून 11 एप्रिलला निघालेली आसूड यात्रा 21 एप्रिलला गुजरातमधील वडनगर या पंतप्रधानांच्या गावी पोचणार आहे. दरम्यान, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा या यात्रेला मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभत असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले.

केंद्राच्या धर्तीवर 16 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात कुठेही चर्चा झाली नाही, दिल्लीला प्रस्ताव पाठवला नाही. वेतन आयोग लागू केल्यानंतर आकडेवारी मागवली जाते, त्याप्रमाणे आधी कर्जमाफीची घोषणा करा, नंतर आकडेवारी गोळा करा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. शेतकऱ्यांनी फासावर जाऊन किंवा विष घेऊन प्रश्‍न सुटणार नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने वेळ न लावता कर्जमाफीची घोषणा करावी, यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू, असे म्हणत त्यांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतून प्रवास
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांतून आसूड यात्रेचा प्रवास होणार आहे. पुढे नाशिक, धुळेमार्गे यात्रा 21 एप्रिलला गुजरातमधील वडनगर येथे पोचेल. दरम्यान, ठिकठिकाणी सभा घेऊन आमदार कडू शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

Web Title: government oppose farmer