हिंगोली : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे- कृषिमंत्री दादा भुसे

file photo
file photo

हिंगोली : कोरोना महामारीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी मार्गक्रमण करीत असतांना स्वत: चे दु:ख बाजूला सारुन राज्यातील सर्व जनतेस कोणत्याही प्रकारचे अन्नधान्य आणि दूधाची कमी पडू दिले नाही, याचे श्रेय सर्व शेतकरी बांधवांना द्यावे लागेल. यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून समाजानेही शेतकरी बांधवांना मानसिक आधार देवून त्यांना साथ देण्याचे आवाहन कृषिमंत्री दादा भूसे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती आणि कृषी योजना अंमलबजावणी बाबतच्या आढावा बैठकीत रविवारी (ता. २७) कृषीमंत्री भुसे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, कृषी सहससंचालक तुकाराम जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, हिंगोलीचे जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे, परभणीचे जिल्हा कृषी अधीक्षक संतोष आळसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत

कृषिमंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले की, सध्या हिंगोली व परभणी जिल्ह्यात दररोजच कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असुन ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडत आहे. अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तेथील पिकांचे जलदगतीने पंचनामे करावेत. यासाठी आवश्यकता भासल्यास ग्रामविकास व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी नियुक्त करुन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. महाराष्ट्रात सगळीकडेच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीची माहिती एकत्रित करुन मंत्रीमंडळ बैठकीत ठेवून शेतकरी बांधवाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच केंद्राकडे देखील याबाबत मदत करण्यासाठी विनंती करण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय पथकास पाहणी दौऱ्याची विनंती करण्यात येणार असल्याचे असल्याचेही श्री. भुसे यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संयुक्त पथक नेमून माहिती घ्यावी आणि निकषात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद करावी. जिल्ह्यातील धरणामध्ये पुरेसा जलसाठा झालेला असून त्यामूळे रब्बी क्षेत्रात वाढ होणार आहे. यासाठी बियाणे व खतांची विशेषत: युरिया खताची कमतरता पडणार नाही याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.

विमा प्रतिनिधींची माहिती घेवून त्यांचे संपर्क क्रमांकांची यादी प्रसिध्दी करावी.

यावेळी श्री. भूसे यांनी पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी भ्रमणध्वणीवर संपर्क साधुन प्रत्येक तालुका आणि क्षेत्रीय पातळीवर संपर्क साधण्याच्या पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सूचना द्याव्यात, असे निर्देश दिले. तसेच क्षेत्रनिहाय विमा प्रतिनिधींची माहिती घेवून त्यांचे संपर्क क्रमांकांची यादी प्रसिध्दी करावी. तसेच या कंपन्याकडे कृषि विभागाने व शेतकऱ्यांनी सद्यस्थितीतील नुकसानीची माहिती कळवावी अशाही सूचना कृषिमंत्री भुसे यांनी यावेळी केल्या.

मुख्यमंत्री यांनी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरु केली 

खरिप पेरणीच्या सुरुवातीस सोयाबीन बियाणांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. या बियाणांची पडताळणी करुन अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही कंपन्याचे परवाने रद्द करण्यात आले. त्यामूळे पुढील पेरणीकरीता शेतकऱ्यांनी स्वत: चे बियाणे तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे काढून ठेवावे. कृषि विभागाने ही मोहीम चांगल्या प्रकारे राबविल्यामूळे बियाणे कमी पडले नाही. मुख्यमंत्री यांनी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरु केली असून ग्राहकांची जी मागणी आहे, त्याच पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे, असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने प्रायोगिक तत्वांवर ५०० रोपवाटीका तयार करण्याचे काम सुरु असून, या रोपवाटीकेमध्ये भाजीपाल्यांची रोपे तयार करण्यात येणार आहेत. याचा जास्तीत- जास्त लाभ मराठवाडा आणि विदर्भाला देण्याचा मानस असल्याचेही यावेळी कृषिमंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

बँक कर्मचाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक 

हिंगोली जिल्ह्यात पिक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प झाले असून जे शेतकरी बांधव बँककडे कर्जाची मागणी करण्यासाठी जात आहे. त्यांना बँक कर्मचाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असुन हे बरोबर नाही. शेतकऱ्यांना सौजन्याची वागणुक देण्याबाबत सर्व बँकांना जिल्हाधिकारी यांनी सुचना करावी आणि पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरु आहे. यासाठी गोडाऊन, शितगृहे, वाहतूक, प्रक्रीया उद्योग आदीबाबत नियोजन करुन शेतकरी उद्योजक निर्मित उत्पादन करण्यात येणार असल्याचे सांगत नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी.

ओला दुष्काळ जाहीर करावा- आमदारांची मागणी

यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सरसकट पिकांचे पंचनामे खूप कमी झाले असून त्यात वाढ करुन तात्काळ मदत करावी अशी मागणी केली. यावेळी आमदार राजु नवघरे यांनी असून यावर्षी ऊस पिकाचे नुकसान देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी जिल्ह्यातील सर्व गावे नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजनेत घेण्याची विनंती केली. तसेच आमदार मुटकुळे व आमदार संतोष बांगर यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली.

औंढा तालुक्यात पिक पाहणी

औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटु, काठोडा तांडा भागात पिक पाहणी दौरा केला आहे. तसेच औंढा नागनाथ येथे भाजीपाला फळ स्टाँलचे उद्घाटन केले. हिवरा जाटु येथे ग्यानदेव उघडे यांच्या शेतातील सोयाबीनची पाहणी केली, तर काठोडा तांडा येथील शेतकरी विठ्ठल बुचके यांच्या शेतातील पिकाची पाहणी केली. औंढा नागनाथ येथील श्री.भोणे या शेतकऱ्याच्या भाजीपाला व फळांच्या स्टॉलचे उद्घाटनही कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com