शासनाकडून साखरेचे दर वाढविण्याच्या हालचाली   

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

  • क्‍विंटलमागे 200 ते 400 रुपये साखर दरवाढीची शक्‍यता आहे. 
  • थकीत एफआरपी च्या मुद्द्यावर तोडगा निघावा यासाठी ​निती आयोगाने टास्क फोर्स कृती दलाची स्थापना केली आहे.
  • चालू हंगामात 350 लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ​

औरंगाबाद : एकीकडे देशात साखरेचे विक्रमी उत्पादन आणि दुसरीकडे घसरलेल्या किमती यामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत. केंद्र सरकारने त्यांना तारण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रयत्न सुरू केले आहेत. साखरेच्या किमान दरात वाढ करून 31 हजार रुपये करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे साखरेमध्ये प्रतिक्विंटल 200 ते 400 रुपयांपर्यंत वाढ होईल, असे साखरेचे होलसेल व्यापारी हरिशंकर दायमा यांनी सांगितले. 

गेल्या काही वर्षांपासून देशात साखरेचे विक्रमी उत्पादन होत असल्याने लाखो टन साखर शिल्लक आहे. त्यातच निर्यात धोरणाबाबत व्यापारी व सरकारमध्ये असलेल्या संभ्रमामुळे विक्रीवर परिणाम होत आहे. साखर कारखान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी जूनमध्ये साखरेला 2900 रुपये दर दिला. गेल्या हंगामात 103 लाख टन साखर शिल्लक होती, तर चालू हंगामात 350 लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उत्पादन खर्चच निघत नसल्याने साखर कारखान्यांकडे सध्या उसाची 20 हजार कोटींची एफआरपी थकीत आहे. सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढता यावा म्हणून निती आयोगाने टास्क फोर्स कृती दलाची स्थापना केली आहे. आर्थिक संकटात असलेल्या साखर कारखान्यांना वाचविण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्‍यता आहे. साखरेचा किमान दर 3100 रुपयांपर्यंत केल्यास साखरेच्या दरात वाढ होऊन सर्वसामान्यांना भुर्दंड बसेल. 

किलोमागे दोन रुपये? 
साखरेचा किमान विक्रीदर वाढल्यास खुल्या बाजारातील साखरेचे दर वाढतील. सद्यःस्थितीत साखरेला प्रतिक्विंटल 3100 ते 3200 रुपयांचा दर मिळत असून किरकोळ बाजारात साखर 33 ते 34 रुपये किलोने विक्री होत आहे. किमान दर वाढल्यास यात किलोमागे एक ते दोन रुपये वाढ होण्याची शक्‍यताही व्यापाऱ्यांतर्फे वर्तवली जात आहे. 
 

Web Title: Government trying to increase the sugar prices