आता पोलिसांच्या वाहनांना जीपीएस!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

औरंगाबाद - गस्तीवरील वाहनांसाठी अत्याधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, घटना घडल्यास त्या क्षेत्रातील वाहन तत्काळ घटनास्थळी पाठवून मदत मिळावी, यासाठी पोलिसांच्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 18) सायंकाळी प्रणालीचे उद्‌घाटन झाले.

औरंगाबाद - गस्तीवरील वाहनांसाठी अत्याधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, घटना घडल्यास त्या क्षेत्रातील वाहन तत्काळ घटनास्थळी पाठवून मदत मिळावी, यासाठी पोलिसांच्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 18) सायंकाळी प्रणालीचे उद्‌घाटन झाले.

चार्ली पोलिसांची दुचाकी, चारचाकी वाहनांचा यात समावेश आहे. टु मोबाईल, वन मोबाईल, दामिनी पथक, टुरिस्ट पोलिस, पीसीआर मोबाईल आदी वाहनांनाही जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. मोबाईल ऍपद्वारे ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. इनकमिंग कॉल पद्धत यात समाविष्ट आहे. वायरलेसद्वारे संदेश देण्यास अडचणी आल्या तर मोबाईलवर या वाहनातील पोलिसांना कॉल करता येणार आहे. पोलिस आयुक्तांना त्यांच्या दालनात असलेल्या स्क्रीनवर वाहनाचे लोकेशन दिसणार असून पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळणार आहे. या वाहनांसाठी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. वाहनांना त्यांचे मार्ग नेमून देण्यात आले आहेत, एखाद्या वाहनाला मार्ग बदलायचा झाल्यास, नियंत्रण कक्षाकडून परवानगी या वाहनातील चालकांना घ्यावी लागेल. प्रणालीच्या उद्‌घाटन प्रसंगी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे, एसीपी रामेश्वर थोरात, सी. डी. शेवगण यांच्यासह इतर पोलिस निरीक्षकांची उपस्थिती होती.

बारा ऐवजी आठ तास काम
गस्तीसाठी वाहनातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बारा तासांऐवजी आता आठच तास काम करावे, असा निर्णय पोलिस आयुक्‍तांनी घेतला. त्यांच्या कामाचे चार तास वगळण्यात आले असून, दोन सत्रांतील गस्त तीन सत्रांत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलिसांना काहीसा आराम मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांचा बक्षिसे देऊन सन्मान
अभियांत्रिकी परीक्षेतील गुणवाढ प्रकरण चव्हाट्यावर आणणारे कर्मचारी सिद्धार्थ थोरात व उपनिरीक्षक विजय जाधव यांना अनुक्रमे पंधरा हजार व दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले. त्यानंतर त्यांचा गौरव केला.

Web Title: gps system in police vehicle