धान्याचे दर वधारले, बाजारातून गहू गायब

धान्याचे दर वधारले, बाजारातून गहू गायब

औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी २८५१, तर मका २०६८ रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे.

औरंगाबादसह मराठवाड्यात यंदा सरासरी पन्नास टक्केही पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत दुष्काळ पडला आहे. खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन, ज्वारी या पिकांच्या उत्पादनावर लक्षणीय परिणाम झाला आहे. परिणामी बाजारात आवक प्रचंड घटली आहे. जिल्ह्यात मकासारखे विक्रमी उत्पन्न होणाऱ्या पिकाचीही सध्या प्रतिदिन शंभर क्‍विंटलच्या वर आवक होईना. ज्वारी, बाजारी तर अधून-मधून विक्रीसाठी येते, तेही २५ ते ३० क्‍विंटल इतकीच. याचा थेट परिणाम धान्यांच्या भावावर पाहायला मिळत आहे. 

गुरुवारी (ता.सात) बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक २७ क्‍विंटल झाली. तर १९८९ ते २८५१ रुपये प्रतिक्‍विंटल प्रमाणे ज्वारीची विक्री झाली. ११० क्‍विंटल मका विक्रीसाठी आला होता, त्याला उच्चांकी १९४० ते २०६८ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. अवघा दोन क्‍विंटल आलेला हरभरा ४४०० रुपयांनी विकला गेला, तर सोयाबीन ३६११ ते ३६२२ रुपये प्रतिक्‍विंटलने विकले.

गहू अडीच हजारांवर
गव्हाचा मळणी हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. लवकरच बाजारात नवा गहू दाखल होईल. मात्र, त्यापूर्वी गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. आठ-आठ दिवस बाजारात गहूच उपलब्ध नसतो. विक्रीसाठी बाजारात गहू आलाच तर २५०० ते २६५० रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विक्री होत असल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली. गव्हाप्रमाणेच बाजरीदेखील अत्यल्प प्रमाणात येत असून २२०० ते २३५० रुपये प्रतिक्‍विंटलने विकली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com