सख्ख्या जावांमध्ये रंगणार निवडणूक; दोघींनी केला सरपंच होण्याचा दावा

प्रशांत शेटे
Tuesday, 12 January 2021

राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निवडणुकींची धामधूम सुरु आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला रंगतदार लढती दिसून येत आहेत.

चाकुर ( लातूर): ग्रामपंचायत निवडणुकीत ठिकठिकाणी रंगतदार लढती होत असताना आता शेळगाव (ता. चाकूर) येथील प्रभाग 3 मधून दोन सख्खा जावा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. दोघी जावांकडून प्रचारात चुरसी आणली जात असून यात कोण बाजी मारणार याकडे गावाचे लक्ष लागले आहे.

तालूक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुक होत असून यात सर्वच गावात निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या काळात नात्यातील निवडणुकीचे काही किस्से ऐकावयास मिळतात. पॅनल प्रमुखाकडून आपल्या स्वार्थासाठी घरातल्या घरात भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातो. भाऊ - भाऊ, सासू - सून, जावा - जावा या नात्यांमध्ये निवडणूक होत असल्यामुळे गावागावात वैर निर्माण करणाऱ्या या निवडणूक ठरत आहेत.

शेतकरी कुटुंबांनी केली काळ्याआईची पूजा; बैलगाडीतून प्रवास

शेळगाव हे तालुक्यातील महत्वाचे गाव असून येथे नऊ सदस्यांची ग्रामंपचायत आहे. येथील सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते. यामुळे या जागेवरून निवडणुक लढणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली होती. सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्यानंतरही या जागेसाठीची निवडणूक महत्वपूर्ण ठरली आहे, ती जावा - जावा मधील लढतीमुळे. 

चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मधून कमलबाई शिवराज चापुले व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून महानंदा सुभाष चापुले या सख्ख्या जावा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यामध्ये विशेष म्हणजे प्रभाग 2 मधून कमल चापूले याचे पती शिवराज चापुले हे देखील निवडणूक लढवीत आहेत.

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा

गावाच्या विकासावर ही निवडणूक लढवली जात असून दोन्ही पॅनल प्रमुखांनी ती प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. दोघी जावांकडून प्रभाग 3 मध्ये जोरदार प्रचार केला जात असून यात नात्यातील इतर व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रभागात 796 मतदार असून सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाले असले तरी आपणच सरपंच होणार हे दोघींकडून सांगितले जात आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार हे मतमोजणीनंतरच कळणार आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election shelgaon chakur latur news