डीएनए चाचणीवरून ग्रामपंचायत सदस्य अपात्र

विकास गाढवे
गुरुवार, 28 जून 2018

खोटे दोषारोपपत्र पाठवले
या प्रकरणाच्या सुनावणीत श्रीमती वाघमारे यांनी डीएनए चाचणी झाली तरी न्यायालयाचा अंतिम निकाल झाला नसल्याचा दावा करत डीएनए चाचणीवरून तिसरे अपत्य आहे, या निष्कर्षाप्रत पोहचता येणार नाही, असे सांगितले. पोलिसांनी खोटेनाटे तपास टिपण करून खोटे दोषारोप पाठवले आहे. साक्षी पुरावा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण निष्पाप आणि निराधार असून अर्जदार महादेव सिरसाट यांना वीस हजार रूपयाचा दंड ठोठावून प्रकरण नामंजूर करावे, अशी मागणी वाघमारे यांनी केली होती. ती फेटाळून लावत जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी वाघमारे यांना अपात्र ठरवले आहे.  

लातूर : गावकीचे राजकारण किती टोकाला जाईल, याचा नेम नाही. आधीच्या दोन मुली असताना वंशाला दिवा म्हणून तिसरा मुलगा झाला. यामुळे अपत्यांच्या संख्येत भर पडून अपात्र होण्याच्या भीतीने रूग्णालय तसेच लसीकरणाच्या वेळी चुकीची नावे नोंद केली. मुलगा आपला नसल्याचे दाखवण्याचा खटाटोप झाला. विरोधी गटाने हे प्रकरण उचलून धरले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर डीएनए चाचणी झाली आणि मुलगा मोहगाव (ता. अहमदपूर) येथील ग्रामपंचायत सदस्या अर्चना वाघमारे यांचा असल्याचे उघड झाल्याने त्यांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अपात्र ठरवले आहे. 

डीएनए चाचणीमुळे ग्रामपंचायतीच्या पंचाला (सदस्य) अपात्र ठरवले जाण्याची ही पहिलीच घटना आहे. श्रीमती वाघमारे या सन 2015 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. ग्रामपंचायत कायद्यात दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास सदस्याला अपात्र ठरवण्याची तरतूद आहे. श्रीमती वाघमारे यांना 2004 मध्ये पहिली तर 2006 मध्ये दुसरी मुलगी झाली. या दोन मुलीची नावे निवडणूक लढवताना त्यांनी उमेदवारी अर्जात नोंदवली आहेत. त्यानंतर 2015 मध्ये मुलगा झाला. तिसऱ्या अपत्यामुळे अडचणी येईल म्हणून वाघमारे यांनी मुलाच्या जन्माच्या नोंदी करताना रूग्णालयात एक तर लसीकरणाच्या वेळी दुसरेच नाव सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी वाघमारे यांच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. सध्या प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून या प्रकरणात मुलगा, श्रीमती वाघमारे व त्यांचे पती दयानंद वाघमारे यांची डीएनए चाचणी करण्यात आली. चाचणीनुसार वाघमारे दाम्पत्यांना तिसरा मुलगा असल्याचे सिद्ध झाले. यामुळे श्रीमती वाघमारे यांना अपात्र करण्याची मागणी गावातील महादेव सिरसाट यांनी केली होती. जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यात डीएनए चाचणी अहवाल जुळत असल्याने श्रीकांत यांनी श्रीमती वाघमारे यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याच्या कारणावरून अपात्र ठरवले व त्यांचे सदस्य पद रिक्त झाल्याचे घोषित केले आहे.

खोटे दोषारोपपत्र पाठवले
या प्रकरणाच्या सुनावणीत श्रीमती वाघमारे यांनी डीएनए चाचणी झाली तरी न्यायालयाचा अंतिम निकाल झाला नसल्याचा दावा करत डीएनए चाचणीवरून तिसरे अपत्य आहे, या निष्कर्षाप्रत पोहचता येणार नाही, असे सांगितले. पोलिसांनी खोटेनाटे तपास टिपण करून खोटे दोषारोप पाठवले आहे. साक्षी पुरावा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण निष्पाप आणि निराधार असून अर्जदार महादेव सिरसाट यांना वीस हजार रूपयाचा दंड ठोठावून प्रकरण नामंजूर करावे, अशी मागणी वाघमारे यांनी केली होती. ती फेटाळून लावत जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी वाघमारे यांना अपात्र ठरवले आहे.  

Web Title: Grampanchayat member DNA test in Latur