पंधरा एकरांतील द्राक्ष बागेवर सीसीटीव्हीची नजर

बाबासाहेब म्हस्के : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

आम्ही मागील 17 वर्षांपासून द्राक्ष लागवड करतो. आलेले अनुभव व प्रयोगशीलता यामुळे पूर्वी कमी असलेले बागेचे क्षेत्र आता पंधरा एकर झाले आहे. द्राक्ष बागेच्या संरक्षणासाठी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा चांगला फायदा होत आहे. द्राक्ष बागेसह घरावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. वायरलेस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चाचणीही घेतली आहे. वायरलेस कॅमेरे वायफायशी जोडून मोबाईलच्या मदतीने शेती सांभाळण्याचे नियोजन करीत आहे.
- संदीप क्षीरसागर, प्रयोगशील शेतकरी, कडवंची

संदीप क्षीरसागर यांचा अनोखा प्रयोग, कडवंची गाव बनतेय द्राक्ष हब

 

जालना : द्राक्ष बागायतदारांची नगरी म्हणून राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कडवंची (जि. जालना) येथील शेतकरी नेहमीच प्रयोगशीलतेला प्राधान्य देतात. द्राक्ष उत्पादन तर भरपूर होतेय आता त्याचे योग्य पद्धतीने संरक्षण व्हावे, यासाठी येथील शेतकरी आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहेत. शेतकरी संदीप क्षीरसागर यांनी आपल्या 15 एकर द्राक्ष बागेच्या संरक्षणासाठी शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

 

खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन, जलसंधारणाला प्राधान्य, एकमेकांना सहकार्य करण्याची भावना, यांत्रिकीकरण व लोकसहभाग याचे महत्त्व कळलेल्या कडवंची गावातील शेतकऱ्यांनी द्राक्ष उत्पादनातून अवघ्या राज्याचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याने किमान एका एकरात द्राक्ष लागवड केली आहे. येथील प्रयोगशील शेतकरी संदीप क्षीरसागर यांच्याकडे 15 एकरांवर द्राक्षबाग आहे. यातून त्यांना 50 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. अगदी मुलांप्रमाणे जपलेल्या द्राक्ष बागेचे चोरटे व रात्रीच्या वेळी रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी क्षीरसागर यांनी बागेतील एंट्री पॉइंटवर 50 हजार रुपयांचा खर्च करून सहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे घरातील मॉनिटरवर बसून 24 तास द्राक्षबागेवर लक्ष ठेवणे सहज शक्‍य झाले आहे. श्री. क्षीरसागर यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता अन्य द्राक्ष बागायतदार शेतकरी आपल्या बागेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करीत आहेत.

द्राक्ष बागेने बदलले अर्थकारण
कडवंची गावात यंदा सुमारे पंधराशे एकरांवर द्राक्ष बागेची लागवड झाली असून, यातून 50 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. गावात एकूण 450 शेततळी आहेत. गावकऱ्यांनी 35 लाखांच्या लोकवर्गणीतून 15 किलोमीटर नाल्याचे खोलीकरण केले आहे. कडवंचीकरांना कर्जासाठी बॅंकेच्या दारात जाण्याची गरज भासत नाही. वेळेत कर्जफेड व उत्पन्नाचा वाढता आलेख यामुळे गावाची पत वाढली आहे. परिणामी बॅंक अधिकारी गावात येऊन कर्जपुरवठ्यासाठी चौकशी करतात. द्राक्ष बागांची निगा राखण्यासाठी परराज्यांतील शंभर जोडपी व आजूबाजूच्या गावांतील दोनशे मजुरांना गावात बारमही काम उपलब्ध आहे. यातून वर्षाला एक कोटीचा रोजगार उपलब्ध झाला आहे.

Web Title: grape garden and cctv