...तर व्यापार दुप्पट, खर्च होईल निम्मा! 

Railway
Railway

औरंगाबाद - पुण्याशी औरंगाबादची असलेली रस्त्याची जोडणी "एक्‍स्प्रेस वे'च्या माध्यमातून नव्याने करण्याचा आराखडा केंद्राने आखला आहे; पण तुलनेने स्वस्त असलेल्या रेल्वेमार्गाच्या पर्यायाचा विचार आता व्हायला हवा. औरंगाबादेतून एक कंटेनर मुंबईला पाठविण्यासाठी 25 हजारांचा खर्च येतो. मात्र, रेल्वेने हा खर्च नऊ ते बारा हजारांवर येणे अपेक्षित आहे. यामुळे खर्च निम्मा, तर व्यापार दुप्पट करण्यास मदतच होईल.

 औरंगाबाद ते पुणे विद्यमान 250 किलोमीटर रस्त्यावरील भार पाहता नव्या "ग्रीनफिल्ड एक्‍स्प्रेस वे'चा पर्याय केंद्र सरकारने "भारतमाला'च्या दुसऱ्या टप्प्यात सुचविला आहे. यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, हे स्पष्ट झालेले नसले तरी, भूपृष्ठावरील रस्तेनिर्मितीत आणि प्रवासासाठी रेल्वेच्या तुलनेने खर्चिक ठरतात. औरंगाबाद-पुणे या शहरांच्या जोडणीसाठी महामार्गासह रेल्वे जोडणीसुद्धा व्हावी, अशी अपेक्षा औरंगाबाद, जालना येथील औद्योगिकजगताला आहे. जालना शहरातून नवी रेल्वेलाईन पुण्याच्या दिशेने गेली तर याच लाभ किमान डझनभर औद्योगिक क्षेत्रांना होईल. निर्यातीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला (जेएनपीटी) जाणारे कंटेनर सध्या रस्त्यांनी जातात. त्यासाठी एक कंटेनरमागे औरंगाबादेतून 20 ते 25 हजार रुपये खर्चावे लागतात. रेल्वेचा पर्याय उपलब्ध झाल्यास हा खर्च 9 ते 12 हजारांवर येईल, असा अंदाज उद्योजक व्यक्त करतात. 
 
एकट्या जालन्यातून 200 कंटेनर! 
जालना शहरातून बियाणे आणि स्टील मोठ्या प्रमाणात निर्यात होते. एकट्या जालन्यातून सध्या पुण्याच्या आणि मुंबईच्या दिशेने दरदिवशी 200 ट्रक माल नेतात. हे कंटेनर रेल्वेच्या साहाय्याने रवाना झाल्यास रेल्वेलासुद्धा महसूल उपलब्ध होईल आणि येथील उद्योगांना स्वस्त पर्याय मिळेल. 

या ठिकाणांची जोडणी शक्‍य 
जालना जुनी, नवी औद्योगिक वसाहत, ड्रायपोर्ट, शेंद्रा एमआयडीसी, डीएमआयसीचे शेंद्रा आणि बिडकीन नोड, औरंगाबाद रेल्वेस्टेशन औद्योगिक क्षेत्र, वाळूज औद्योगिक क्षेत्र, केडगाव एमआयडीसी, नगर, सुपे वसाहत, रांजणगाव, शिरूर या औद्योगिक वसाहतींना रेल्वेलाईनच्या साह्याने स्वस्तात माल पाठविणे सोपे होऊ शकेल. 

वाळूजचे औद्योगिक संबंध 70 देशांशी 
वाळूज औद्योगिक क्षेत्राने ऑटोजगतात मोठी भरारी घेतली आहे. कार्यक्षमता आणि सातत्याच्या संशोधनाने जगाच्या गरजा पुरविण्यात कसोटीवर उतरलेल्या वाळूज औद्योगिक वसाहतींचे 70 देशांशी औद्योगिक संबंध तयार झाले आहेत. आगामी काळात ही लय कायम राखायची असेल, तर रेल्वेमार्ग होणे गरजेचे आहे, असे मत उद्योजक व्यक्त करतात. 
 

एकट्या जालना शहरातून 200 ट्रक माल दरदिवशी पुणे आणि मुंबईकडे रवाना होतो. एक कंटेनर मुंबईला पाठविण्याचा खर्च सध्या 25 हजार आहे. तो रेल्वेमार्गाने 9 ते 12 हजारांवर येणे अपेक्षित आहे. 
- प्रसाद कोकीळ, उद्योजक. 
 


औरंगाबादेतून हजारो लोक शिक्षण आणि नोकरीनिमित्त पुण्याकडे दरदिवशी प्रवास करतात, त्यांचा प्रवास सोयीचा होईलच; पण कोकण, गोवा, कर्नाटक आणि दाक्षिणात्य बाजारपेठा मराठवाड्याला जवळ येतील. 
- अनंत बोरकर, सचिव, मराठवाडा रेल्वे कृती समिती 
 

'सकाळ'ची भूमिका 
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चौकटीबाहेर विचार गरजेचा आहे. "एक्‍स्प्रेस वे'ची उभारणी हवी आहेच; पण औरंगाबाद आणि पुणे या शहरांना रेल्वेने जोडणी मिळाली, तर मराठवाड्यातील उद्योग अधिक चांगली स्पर्धा करू शकतील. शिवाय दरदिवशी या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांना स्वस्त पर्याय उपलब्ध होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com