ग्रुप करून जनावरांची चराई 

 औरंगाबाद ः चाराटंचाईवर मात करण्यासाठी एकत्रित आलेले हेच ते कनकोरी (ता. गंगापूर) येथील ज्येष्ठ शेतकरी.
औरंगाबाद ः चाराटंचाईवर मात करण्यासाठी एकत्रित आलेले हेच ते कनकोरी (ता. गंगापूर) येथील ज्येष्ठ शेतकरी.

औरंगाबाद -  "जनावरालं शेतकरी कदरले. नाईलाजास्तव संबाळातोय. इंकायला घेऊन जा, तर कापणाऱ्याशिवाय कुणी घेत नई. त्याला टाकायला कई नई, म्हणून समुहिक चराई करीत रानावनात ढोरं घेऊन हिंडतो...' असे पंचाहत्तरीतील कडुबाळ तेजीनकर सांगत होते. 

दुष्काळामुळे गंगापूर तालुक्‍यातील कनकोरी व गावशिवारातील जनावरांना पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा आहे. त्यामुळे गावातील आठ ते दहा ज्येष्ठ शेतकऱ्यांनी एकत्र येत 60 जनावरांची सामुदायिक चराई सुरू केली आहे. दिवसभर शिवारातील पडीक शेतात जनावरे वळत चाराटंचाईवर काहीशी मात करण्याची त्यांची धडपड सुरू आहे. 

चाराटंचाईमुळे गावातील काही जनावरे विकण्यात आली. जी शिल्लक आहेत ती जगविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी अनेक दिवसांपासून धडपड सुरू केली आहे. सध्या गावात तीन ते चार हजार जनावरे आहेत. त्यांना केवळ महिनाभर पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे. तो राखीव ठेवत काही शेतकरी अन्य तालुक्‍यांतून विकत घेत आहेत, तर काही मोकळ्या वावरात चराई करून धकवत असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. ग्रुप चराईतील सुंधराव पवार म्हणाले, "सध्या अडीच ते तीन हजार रुपयांत चाऱ्याच्या शंभर पेंढया येतात. सध्या बैलजोडीला आठ दिसाला अडीच हजार रुपये खर्च येत आहे. चारा छावणीची गरज असतानाही ती सुरू केली नाही. आम्हाला एक वेळ कर्ज देऊ नका; पण जनावराला पाणी, चाऱ्यांची व्यवस्था करा. गेल्या वेळी शासनाकडे छावणीची मागणी केली होती. काहीच झाले नाही. म्हणून आम्ही रडतो ते फक्त त्या परमेश्‍वरापाशी.' 

रघुनाथ पवार म्हणाले, "दुष्काळात असे खचून चालणार नाही. शासनाची मदतीची वाट न पाहता आम्ही गावातील आठ ते दहा शेतकरी एकत्र आलो. आम्ही 60 ते 70 जनावरे दिसेल त्या वावरात चराईसाठी घेऊन जात आहोत. हे आम्ही सातत्याने करीत जनावरे जगविणार आहेत'. 

या ज्येष्ठांचा सहभाग 
सामुदायिक चराई उपक्रमात दत्तात्रय गवळी, सुगंधराव पवार, कडुबाळ तेजीनकर, रघुनाथ पवार, निवृत्ती पवार, कडू पवार, बबन डव्हाण, योगेश शेळके, साहेबराव पवार, कैलास पवार आदी ज्येष्ठ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत ते जनावरांना चराईचे काम करतात. एकमेकांच्या जनावरांच्या पोटाची काळजी घेतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com