जिल्ह्यात भूजल पातळीत 1.44 मीटर घसरण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

जालना - दुष्काळाच्या तांडवानंतर गत पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे यंदा पाणी पाणीटंचाईचे चटके कमी प्रमाणात जाणवत आहेत; तसेच गतवर्षीपेक्षा यंदा पाणीपातळीमध्ये होणारी घट ही काही प्रमाणात कमी आहे. भूजल विभागाच्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यामध्ये 1.44 मीटरने पाणीपातळीमध्ये घट झाली आहे. गतवर्षी या काळात जिल्ह्यातील पाणीपातळी अडीच ते तीन मीटरने घटली होती. 

दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर पावसाचे पाणी अडवा आणि ते जमिनीत जिरवा ही मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात आली. जालना जिल्ह्यातही जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे गत पावसाळ्यामध्ये झालेल्या पावसाचे वाहून जाणारे पाणी अडले आणि जमिनीमध्ये जीरले. त्यामुळे पाणीपातळीमध्ये होणारी घट काही प्रमाणात का होईना पण कमी झाली आहे. भूजल विभागाच्या मार्च महिनाअखेरच्या अहवालानुसार जिल्ह्याची पाणीपातळी ही 1.44 मीटरने घटली आहे. तर याच विभागाच्या गतवर्षीच्या अहवालानुसार मार्च 2016 अखेरीस जिल्ह्याची पाणीपातळी अडीच ते तीन मीटरने घटली होती. दरम्यान, यंदाही जलसंधारणाची कामे गतवर्षीप्रमाणे दर्जेदार झाल्यास येणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीमध्ये जिरण्यास मदत होईल. त्यामुळे पाणीपातळीमध्ये होणारी घट रोखण्यास मदत होईल. 

कूपनलिकांवर हवा अंकुश 
भूगर्भातील पाणीपातळीमध्ये घट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कूपनलिकांच्या माध्यमातून होणारा बेसुमार पाण्याचा उपसा. दुष्काळाचे तांडव उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर आजही पाचशे-सहाशे फूट खोल कूपनलिका घेण्याचा सपाटा सुरूच आहे. त्यामुळे यावर अंकुश लावणे अपेक्षित आहे. जर कूपनलिकेच्या माध्यमातून होणारी चाळण थांबली तर पाणीपाळतीमध्ये वाढ होण्यास मदत होईल. 

मार्च महिन्याअखेरचा भूजल विभागाचा पाणीपातळी अहवाल 
तालुका स्थिर पाणीपातळी झालेली घट 
जालना 9.59 1.15 
बदनापूर 12.44 1.08 
भोकरदन 8.72 1.63 
जाफराबाद 9.25 0.98 
परतूर 10.57 1.61 
मंठा 9.90 2.06 
अंबड 10.38 1.39 
घनसावंगी 11.18 1.62 
-------------------------------- 
एकूण 10.25 1.44 

Web Title: Ground water level in the district is 1.44 meters