तलावाभोवती खडा पहारा!

तलावाभोवती खडा पहारा!

औरंगाबाद - पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या तलावात टाकलेल्या मोटारींच्या विरोधात तलवाडा (ता. वैजापूर) येथील गावकऱ्यांनी खडा पहारा दिला आहे. रात्रीचा वीजपुरवठा असल्यास हमखास होणाऱ्या या उपशाला लगाम घालण्यासाठी गावकऱ्यांनी तलावाभोवती चक्क गस्त सुरू केली आहे.

पाणी ‘शेतीसाठी की पिण्यासाठी’ असा संघर्ष या निमित्ताने वैजापूर तालुक्‍यातील तलवाडा गावात झाल्याचे समोर आले आहे. शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी टाकण्यात आलेल्या मोटारी काढण्यासाठी पूर्ण गावाने कंबर कसली. गेल्या आठवड्यात तलावाच्या बांधावर जाऊन सरकारी यंत्रणेला जागे करीत या मोटारी काढण्यास गावकऱ्यांनी भाग पाडले. सध्या तलवाड्याच्या तलावात ३ ते ४ महिने टिकेल एवढा जलसाठा आहे. मात्र, त्यावर शेती केली, तर हा साठा लवकर संपणार असल्याने गावकऱ्यांनी हे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याचा पवित्रा घेतला. या मोटारी काढल्यानंतर रात्रीच्या वेळेत पाण्याचा उपसा होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी तलावाभोवती खडा पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

महिला-तरुणांचा पुढाकार
पाण्याचा वापर शेतीसाठी न करता ते पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, या मागणीसाठी तलवाडावासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. विशेष म्हणजे, या विरोधात महिला आणि तरुणांची संख्या मोठी आहे. दीडशे जणांनी हा पहारा सुरवातीला दिला आणि प्रत्येकी पाच एचपी क्षमतेच्या चार मोटारी पाण्याबाहेर काढण्यास भाग पाडले. आता आठ ते दहा जणांचा गट गावात तयार करण्यात आला असून, हा पहारा नियमित सुरू असल्याची माहिती ग्रामस्थ राजू मगर यांनी दिली. 

सनदी मार्ग अनुत्तीर्ण 
पाण्याचा होणारा उपसा रोखण्यासाठी तलवाडावासीयांनी सनदी मार्गाचा स्वीकार केला. त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना पाणी पिण्यासाठी राखून ते शेतीसाठी न देण्याची मागणी केली होती. मात्र, हा मार्ग अनुत्तीर्ण ठरला आणि गावकऱ्यांनी तलाव गाठून या अधिकाऱ्यांना फोन करून घाम फोडला. त्यानंतर शासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांना सांगून या मोटारी काढायची कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com