पालकमंत्र्यांनी ठोकला गोशाळेत मुक्काम

KAMBLE
KAMBLE

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोशाळेमध्ये पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी (ता़. 9) रात्री मुक्काम ठोकला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यासंदर्भात माहिती घेतली.

पालकमंत्री दिलीप कांबळे गुरुवारपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द, रामवाडी, उमरा या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर कांबळे यांनी सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक या दुर्गम भागात जाऊन त्याठिकाणी गोशाळेमध्ये रात्री मुक्काम ठोकला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांनी हमी योजनेची कामे सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिवाय पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असून त्यावर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

जनावरांसाठी सध्याच्या स्थितीत चारा असला तरी पुढील काळात चारा छावणीची गरज भासू शकते असेही शेतकऱ्यांनी सांगितले. पालकमंत्री श्री. कांबळे आणि रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांशी संवाद साधत दुर्गम भागातील पिण्याचे पाणी, रस्ते, हमी योजनेची कामे, चारा टंचाई प्रस्तावावर चर्चा केली. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे नगरसेवक गणेश बांगर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी कुठलाही बडेजाव न दाखवता प्रत्येक जनावरांना चारा घातला.

यासंदर्भात कांबळे यांनी सकाळशी बोलताना सांगितले की जिल्ह्यात सध्याच्या स्थितीमध्ये चारा उपलब्ध आहे. मात्र भविष्यात चार्‍याचा प्रश्न गंभीर झाल्‍यास तातडीने चारा छावण्या उभारल्या जातील. काही गावांमधून दूषित पाणीपुरवठा होत असला तरी त्या गावांमध्ये फिल्टर चे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न राहणार आहे. याबाबतच्या सूचना ही प्रशासनाला दिल्या आहेत. टंचाई काळामध्ये मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी हमी योजनेची कामे सुरू केली जातील. प्रत्येक गावातून किमान दहा कामे सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई असलेल्या गावांमधून मागेल त्याला टॅंकर तसेच इतर उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन शेतकरी, पशुपालक व नागरिकांच्या पाठीशी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com