दुधात मीठ टाकण्याचे प्रयत्न ; निलंगेकरांची सेनेवर टीका

हरी तुगावकर
मंगळवार, 27 मार्च 2018

''हा कारखाना आणल्याने तुमच्याकडे रेल्वेमंत्री म्हणूनच पाहिले जात आहे, यावर निलंगेकर म्हणाले. लातूरने भाजपला भरभरून दिले आहे. या कारखान्याच्या माध्यमातून काहीही अपेक्षा नाही. जनतेचे फक्त आशीर्वाद पाहिजे. पण भविष्यात रेल्वेमंत्री व्हायला आवडेल''.

-  संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री

लातूर : लातूर येथे होणाऱय़ा मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याचे
भूमिपूजन (ता. ३१) शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते होणार आहे. पण गेल्या काही दिवसांपासून काही मंडळी राजकीय द्वेषापोटी दुधात मीठ टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे मंगळवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत केली.

गेल्या काही दिवसापांसून शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अभय साळुंखे हे या कारखान्यावरून निलंगेकर यांच्यावर सातत्याने टीका करीत आहेत. निलंगेकर हे जनतेची दिशाभूल करीत आहेत. हे सातत्याने सांगत आहेत. यावर निलंगेकर यांनी आज मौन सोडले. राजकीय द्वेषापोटी दुधात मीठ टाकण्याचा प्रयत्न
काही मंडळी करीत आहेत. सर्वांच्या प्रयत्नातून एक चांगले कार्य होऊ पाहत आहे. पण काही जणांच्या पोटात दुखत आहे. त्याकडे मी दुर्लक्ष केले आहे, असे ते म्हणाले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका असो किंवा विधानसभेची निवडणूक असली की `व्हिक्टोरिया`चे प्रकरण चर्चेत आणले जाते. याचा माझा काहीही संबंध नाही. मी
फक्त गॅरेंटर आहे. आता रेल्वे बोगी कारखान्याचे चांगले काम होत आहे. त्यामुळे पुन्हा ते चर्चेत आणले. मी यावर आताच काही बोलणार नाही. पण ३१ मार्चचा भूमिपूजन कार्यक्रम झाल्यानंतर मात्र 1 एप्रिल रोजी सर्व काही बोलून दूध का दूध व पाणी का पाणी करेन, असे निलंगेकर म्हणाले.
 

Web Title: Guardian minister Sambhaji patil nilangekar criticizes Shivsena