पारंपरिक गुढ्यांबरोबरच अनेक गावांत उभारले भगवे ध्वज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

बीड - मराठी नववर्षाची सुरवात असणारा गुढी पाडवा सण मंगळवारी (ता. 28) जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. पारंपरिक गुढ्यांबरोबरच अनेक गावांत व शहरांमधील अनेक घरांसमोर भगव्या ध्वजाच्या गुढ्या उभारण्यात आल्या, हे यंदाचे वेगळेपण ठरले. अनेकांनी घर, दुचाकी खरेदीचा मुहूर्त साधला. 

गुढीपाडवा हा नववर्षाचा सण व साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त आहे. दरम्यान, मंगळवारी अनेकांनी बांबूला साडी, खण लावून त्यावर तांब्या उलटा लावून त्याला साखर गाठी बांधून गुढी उभारली. त्याला कडूलिंबाच्या फुलांत चिंच व गूळ मिसळलेला नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच पूर्ण मुहूर्त असल्याने अनेकांनी दुचाकी, घर, सोने खरेदीचाही मुहूर्त साधला. पाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी राजांची हत्या झाल्यामुळे त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून भगव्या ध्वजाची गुढी उभारावी, असे आवाहन विविध मराठा संघटनांकडून मागच्या काळात करण्यात आले होते. सोशल मीडियातूनही असे आवाहन करण्यात येत होते. त्यातच मराठा क्रांती मोर्चामुळेही या जनजगृतीत भर पडल्याचा परिणाम मंगळवारी जिल्ह्यात दिसून आला. आदल्या दिवशीच दवंड्या देऊन अनेक गावांनी भगव्या ध्वजांची गुढी उभारली. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

Web Title: gudhipadwa celebration in beed