गुढीपाडव्याला 1100 मोटारींची विक्री 

गुढीपाडव्याला 1100 मोटारींची विक्री 

औरंगाबाद - साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त मानला जातो. यानिमित्त घरामध्ये नव्या वस्तूचे आगमन हमखास होते. नोटाबंदीनंतर बाजारातील हालचाली मंदावल्या होत्या. गुढीपाडव्यानिमित्त वाहन, रिअल इस्टेट, सोने-चांदी आणि इलेक्‍ट्रॉनिक बाजारामध्ये तेजी बघायला मिळाली. दरवर्षीपेक्षा यंदा एकूण बाजारातील उलाढालीत मंगळवारी (ता. 28) 30 ते 40 टक्‍के वाढ झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्‍त केला आहे. 

यंदा गुढीपाडवा व मार्चएंड एकत्र आल्याने बाजारापेठेतील व्यवहारांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते; मात्र मुहूर्तापुढे मार्चएंड फिका पडला. राष्ट्रीयीकृत, खासगी आणि पतसंस्थांनी सुट्या व मार्चएंडचे कारण सोडून ग्राहकांना कर्ज देण्यासाठी तत्परता दाखविली. त्यामुळे एकट्या औरंगाबादमध्ये साधारणत: 1100 चारचाकींची बंपर विक्री झाली. यामध्ये साडेपाचशे कार साडेतीन ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान होत्या. उर्वरित 300 कार सहा ते आठ लाख, तर उर्वरित तीनशे कार आठ ते बारा लाखांदरम्यानच्या आलिशान कारची विक्री झाल्याचा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्याचबरोबर दोन हजारच्या आसपास दुचाकींची विक्रमी विक्री झाली होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन बाजारातील उच्चांकी विक्रीचा जल्लोष शोरूमवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी साजरा केला. येत्या काळात दुचाकी आणि कारची विक्री समप्रमाणात झाल्यास वावगे वाटणार नाही. प्रामुख्याने सरकारी व खासगी नोकरवर्गाने कारच्या विक्रीला बळकटी दिल्याचा अंदाज आहे. 

गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी शहरातील सराफा दुकाने सजली होती. ग्राहकांसाठी सराफा दुकानदारांनी मंगळसूत्र, नेकलेस अंगठ्या, बांगड्या विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध केले आहेत. पारंपरिक डिझाईन्समधील दागिन्यांबरोबरच नवीन लूकमधील दागिन्यांना पसंती मिळाली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शहरातील शोरूमनी खास सवलत योजना सादर केल्या होत्या. प्रामुख्याने घडणावळणीवर भरघोस सूट, ठराविक सोने खरेदीवर गिफ्ट, तर प्रत्येक खरेदीवर हमखास बक्षीस योजना सादर करण्यात आल्या. त्याशिवाय लाईटवेट ज्वेलरी प्रकारातील नेकलेस, ब्रेसलेट, बॅंगल्स, अंगठी आणि गळ्यातील चेनलाही मागणी होती. 

क्रेडाई औरंगाबाद शाखेचे माजी अध्यक्ष पापालाल गोयल म्हणाले, की सर्वांचे घर होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने व्याजदर कपातीसह काही योजना आणल्या. त्यामुळे प्रामुख्याने मध्यमवर्गीयांच्या स्वप्नातील घर लवकरच प्रत्यक्षात साकारण्याला वाव आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाचाही परवडणारी घरे घेण्याचा कल वाढलेला आहे. सध्या औरंगाबादमधील सातारा परिसर, शेंद्रा-बिडकीन, करमाड, हर्सूल आणि पैठण रोडला असंख्य गृहप्रकल्प रेडी आहेत. एकंदरित रेडी पझेशन गृहप्रकल्पांना ग्राहकांची पसंती होती. गुढीपाडव्याला आठशे ते एक हजार गृहप्रवेश झाल्याचा अंदाज आहे. 

शुद्ध सोन्यासह लाईटवेटला प्राधान्य 

लालचंद मंगलदास सोनी ज्वेलर्सचे संचालक उदय सोनी म्हणाले, की लाईटवेट ज्वेलरीसह शुद्ध सोने खरेदीला ग्राहकांकडून अधिक प्राधान्य दिले जात आहेत. शुद्ध सोन्याला चांगली किंमत मिळत असल्याने गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जाते. यंदा चांगला पाऊस आणि लगेचच लग्नसराईचा हंगाम सुरू होतो आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत बुकिंगही चांगली झालेली आहे. तरीसुद्धा नोटाबंदीचा काही प्रमाणात फटका बसणार आहे. सध्या शुद्ध सोन्याचे भाव 29 हजार रुपये प्रति तोळ्याच्या आसपास स्थिर राहिले. दर स्थिर असल्याने गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा बाजारामध्ये वीस ते पंचवीस टक्‍के उलाढाल अधिक झाली असल्याचा अंदाज आहे. 

यंदा गुढीपाडव्याच्या शासकीय नोकरवर्गासाठी बॅंकांनी शंभर टक्‍के वाहन कर्ज योजना सादर केली होती. या योजनेला प्रतिसाद दिल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत कार विक्रीमध्ये भरघोस वाढ झाली. त्याशिवाय मार्चएंडला बाजूला सारून बॅंकांनी स्वतंत्र व्यवस्था करून कर्जे तत्काळ मंजूर करून दिली. 
- विकास वाळवेकर, व्यवस्थापक, धूत ह्युंदाई 

नोटाबंदीनंतर तब्बल गुढीपाडव्याने मुहूर्त साधत बाजारातील मंदी हटवली. एकाच दिवसात तब्बल दीड ते दोन हजार दुचाकी विक्री झाल्याचा अंदाज आहे. चारचाकीचाही पर्याय उपलब्ध असल्याने दुचाकी विक्रीवर परिणाम होतोय; मात्र गुढीपाडव्याला दुचाकींच्या विक्रीने उच्चांकी गाठली. 
-हेमंत खिंवसरा, संचालक, राज ऑटो 

गुढीपाडव्यानिमित्त बाजारामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक उत्पादनांतील फ्रीज, एअर कंडिशनर, कूलर आणि एलईडी टीव्हीला ग्राहकांची मागणी अधिक होती. या सर्वांच्या किमती सहा हजारांपासून पुढे होत्या. येत्या काळात हे चित्र कायम राहण्याची अपेक्षा आहे. 
- अजय शहा, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com