गुढीपाडव्याने बाजारात तेजीचे संकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

औरंगाबाद - गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरवात. या मुहूर्तावर इलेक्‍ट्रॉनिक, रिअल इस्टेट, वाहन आणि सोने-चांदी खरेदी करणे चांगले मानले जाते. वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी वस्तू घरात येणे सकारात्मक प्रतीक समजले जाते. त्यामुळे नोटाबंदीच्या तब्बल सहा महिन्यांनंतर बाजारात तेजीचे संकेत मिळाले आहेत. 

औरंगाबाद - गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरवात. या मुहूर्तावर इलेक्‍ट्रॉनिक, रिअल इस्टेट, वाहन आणि सोने-चांदी खरेदी करणे चांगले मानले जाते. वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी वस्तू घरात येणे सकारात्मक प्रतीक समजले जाते. त्यामुळे नोटाबंदीच्या तब्बल सहा महिन्यांनंतर बाजारात तेजीचे संकेत मिळाले आहेत. 

बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीपासून ते आतापर्यंत बाजारपेठा थंड पडल्या होत्या. किरकोळ वस्तू वगळता मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहारही ठप्प झाले होते. नोटाबंदीचा परिणाम ओसरण्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली होती. अखेरीस गुढीपाडव्याने नव्या वर्षाची चांगली सुरवात करून येत्या लग्नसराईमध्ये बाजारात तेजीचे संकेत दिले. मागील तीन दिवसांपासून दुचाकी, कार आणि सोन्याचे आभूषणांसाठी शोरूममध्ये गर्दी बघायला मिळतेय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय इलेक्‍ट्रॉनिक उत्पादने खरेदीसाठी वित्तीय कंपन्यांनी एक रुपया भरून उर्वरित रक्‍कम हप्त्यामध्ये परतफेड करण्याच्या योजना आणल्या आहेत. 

रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात केलेल्या कपातीमुळे वित्तीय कंपन्यांनीही गृहकर्ज व वाहनकर्जात चांगलीच घट केली आहे. त्यामुळे ग्राहकांनाही आर्थिक बोजा न पडता खरेदीचा जोर वाढताना दिसतो. येत्या काळात व्याजदर कायम राहिल्यास पुढील वर्षभर बाजारात सकारात्मक परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. 

रिअल इस्टेटला बळकटी 
क्रेडाई औरंगाबाद शाखेचे माजी अध्यक्ष पापालाल गोयल म्हणाले, की सर्वांचे घर होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने व्याजदर कपातीसह काही योजना आणल्या. त्यामुळे प्रामुख्याने मध्यमवर्गीयांच्या स्वप्नातील घर लवकरच प्रत्यक्षात साकारण्याला वाव आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाचाही परवडणारी घरे घेण्याचा कल वाढलेला आहे. सध्या औरंगाबादमधील सातारा परिसर, शेंद्रा-बिडकीन, करमाड, हर्सूल आणि पैठण रोडला असंख्य गृहप्रकल्प रेडी आहेत. एकंदरीत रेडी पझेशन गृहप्रकल्पांना ग्राहकांची पसंती आहे. गुढीपाडव्याला किमान आठशे ते एक हजार गृहप्रवेश होतील, असे जाणकारांनी सांगितले. 

Web Title: gudi padwa shopping aurangabad