गुळज बंधाऱ्यात मृत पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

उमापूर - गेवराई तालुक्‍यातील उमापूर, मालेगाव खुर्द-बुद्रुक, पाथरवाला, गुंतेगाव, कुरणपिंप्री, गुळज, जळगाव, महार टाकळी या दहा गावांचा पाणीपुरवठा हा गोदावरी नदीवरील गुळज- हिरडपुरी बंधाऱ्यावर अवलंबून आहे. या बंधाऱ्याची पाणीपातळी मृत साठ्यावर आल्याने केवळ आठ दिवस पुरेल इतकेच पाणी आता उपलब्ध आहे.

 कुरणपिंप्री ते गुळज यादरम्यान गोदावरी नदीकाठच्या गावातील सिंचन विहीर व कूपनलिकेची पाणीपातळी खालावत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गोदावरी नदीवरील गुळज हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. मात्र अद्याप बंधाऱ्यात पाणी सोडले नाही. या बंधाऱ्यात तत्काळ पाणी सोडले तरच दहा गावांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहू शकतो.

बंधाऱ्यात लवकर पाणी सोडले नाही तर रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची हातची पिके जातील. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या दहा गावांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडण्याची भीती आहे. बंधाऱ्यात पाणी नसल्याने उमापूर गावाला दहा दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.   गुळज येथील बंधाऱ्यात उमापूर गावाची पाणीपुरवठा करणारी विहीर असून विहिरीतून उमापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते व गावासह मारोतीची वाडी, माटेगाव, खळेगाव, देशमुख वस्ती, खंडोबा वस्ती या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्यास उमापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रावरुन पाणीपुरवठा केला जातो. मात्र गुळज बंधाऱ्यात पाणी नसल्याने उमापूर येथे सध्या आठ ते दहा दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे.

हिरडपुरी गुळज या बंधाऱ्यात जायकवाडी येथील धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी उमापूर, गुळज, पाथरवाला, मालेगाव, कुरणपिंप्री, गा. जळगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: gulaj bandara dead water stock