प्रतियुती असल्याने गुरू येणार पृथ्वीच्या सर्वांत जवळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

औरंगाबाद - सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू हा पृथ्वी व सूर्याशी प्रतियुतीत येत असल्याने गुरुवारी (ता. १०) तो पृथ्वीच्या सर्वांत जवळ पाहायला मिळणार आहे, अशी माहिती एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

औरंगाबाद - सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू हा पृथ्वी व सूर्याशी प्रतियुतीत येत असल्याने गुरुवारी (ता. १०) तो पृथ्वीच्या सर्वांत जवळ पाहायला मिळणार आहे, अशी माहिती एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

गुरुवारी सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर पूर्वेकडे गुरू तेजस्वी स्वरूपात पाहायला मिळणार आहे. सध्या गुरू ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असून, येत्या काही दिवसांपर्यंत तो असाच राहणार आहे. हा ग्रह गुरुवारी रात्री आकाशात आपले लक्ष आकर्षित करणार असल्याचेही औंधकर यांनी सांगितले. खगोलशास्त्रीय भाषेत गुरू ग्रहाची तेजस्विता ही उणे २.५ इतकी असणार असून, पृथ्वी आणि गुरूमधील अंतर हे १० मेरोजी सर्वांत कमी म्हणजे ६६ कोटी किलोमीटर अंतरावर असणार आहे.

दहा टक्के मोठा 
सध्या गुरू ग्रह तूळ राशीत आहे. गुरू आणि पृथ्वीत सरासरी अंतर ७५ कोटी किलोमीटर असते. सरासरी अंतरापेक्षा नऊ टक्के अंतर जवळ आल्याने गुरू ग्रहाचे बिंब हे सुमारे दहा टक्‍क्‍यांनी मोठे पाहायला मिळेल, असेही श्री. औंधकर म्हणाले. गुरू ग्रह आकाराने जवळपास एक लाख चाळीस हजार किलोमीटर म्हणजे आपल्या पृथ्वीपेक्षा अकरा पट मोठा आहे. पुढील दोन्ही वर्षी गुरू ग्रह या वेळेस पेक्षाही अधिक जवळ येणार आहे; मात्र या दोन्ही वेळेस (जून २०१९ / जुलै २०२०) दरम्यान आपल्याकडे पावसाळा असल्याने पाहायला मिळेल की नाही याची शाश्‍वती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यंदा सायंकाळी दुर्बिणीमध्ये या ग्रहाला पाहिले असता गुरू ग्रहाचे चार चंद्र ‘आयो, युरोपा, ग्यानेमिड व क्‍यालिस्टो’ पाहता येतील, सोबतच गुरू ग्रहावरील विषुववृत्तीय पट्टे व गुरू ग्रहावरील ‘महाकाय रक्तवर्णीय डाग’ (Great Red Spot) पाहण्याची संधीही मिळणार आहे.
- श्रीनिवास औंधकर.

Web Title: guru planet earth