esakal | लातुरात साडेसात लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Gutkha

अवैध पद्धतीने कर्नाटकातून आणलेला साडेसात लाख रुपयांचा गुटखा लातूर पोलिसांनी मंगळवारी (ता.२२) पकडला आहे.

लातुरात साडेसात लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही अवैध मार्गाने गुटखा आणून त्याची विक्री केली जात आहे. असाच अवैध पद्धतीने कर्नाटकातून आणलेला साडेसात लाख रुपयांचा गुटखा लातूर पोलिसांनी मंगळवारी (ता.२२) पकडला आहे. पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी पहाटे चार वाजता ही कारवाई केली आहे.

लातूरसाठी ऑगस्टपेक्षा सप्टेंबर ठरतोय धोकादायक, वीस दिवसांत सहा हजार २७७ जण...


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे अवैध धंद्यांवर पोलिसांचे लक्ष आहे. श्री.सांगळे यांनी शहरात गस्तही वाढवली आहे. मंगळवारी पहाटे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड व त्यांच्या पथकातील पोलिस नाईक दत्ता शिंदे, कॉन्स्टेबल जिशान शेख, एस.बी.खंदाडे हे खोरीगल्ली भागात गस्त घालत होते. पहाटे चारच्या दरम्यान त्यांना आएशा कॉलनी भागात एक टेम्पो दिसला. या टेम्पोत त्यांना काही पोत्यात भरलेला माल आढळून आला.

पोलिसांनी अधिक तपासणी केली असता या सर्व पोत्यात गोवा नावाचा गुटखा भरलेला दिसून आला आहे. तातडीने पोलिसांनी हा टेम्पो तसेच आतमधील चालक व दोघांना तातडीने ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली. दुपारनंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले.

रस्ता चांगला की खराब? कळणार एका क्लिकवर, लातूर जिल्ह्यासाठी खास सॉफ्टवेअर

त्यांनी सर्व गुटख्याचा तपासणी केली. साडेसात लाख रुपयांचा हा गुटखा निघाला आहे. पाच लाखांचा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे, असा एकूण साडेबारा लाखांचा माल पोलिसांनी जप्त करून आसिफ मदारसाब मुल्ला (रा.पडसाळगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), महमद मदार कारले (रा. चिंचोली, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) तसेच इब्राहीम बशीर तांबोळी (रा.रेणापूर) या तीघांना अटक केली आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. लोंढे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांची ही मोठी कारवाई आहे. यात साडेसात लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा गुटखा कोठून आला होता. तो शहरात कोणत्या व्यापाऱ्याकडे चालला होता याचा तपास आता करण्यात येणार आहे.
- सचिन सांगळे, पोलिस उपअधीक्षक.


संपादन - गणेश पिटेकर