वसमत पोलिसांनी 20 लाख रुपयांचा गुटखा पकडला

मंगेश शेवाळकर
गुरुवार, 30 मे 2019

सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास नांदेड़-वसमत महामार्गावरील एका पेट्रोल पंपा जवळ मध्यप्रदेशची पासिंग असलेला ट्रक दिसून आला. त्यावरून पोलिसांच्या पथकाने ट्रकचालकाचे चौकशी सुरू केली.

हिंगोली : वसमत शहर पोलिसांच्या पथकाने बुधवारी ( ता.२९) मध्यरात्री  संशयावरून एका ट्रकची तपासणी केली असता  ट्रक मध्ये तब्बल वीस लाख रुपयांचा गुटखा आढळून आला आहे.  पोलिसांनी  सदर गुटखा जप्त केला असून याबाबतची माहिती परभणीच्या अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे.

वसमत शहरात बुधवारी रात्री गुटख्याचा ट्रक वसमतमध्ये दाखल होणार असल्याची माहिती वसमत शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक रविंद्रसिंग धुन्ने , जमादार साहेबराव राठोड़, राजु सिद्दीकी, आर.एल. सुरदूसे, श्री. ढेबंरे, श्री.पोले, श्री. सूर्यवंशी यांच्या पथकाने वाहनांची तपासणी सुरू केली होती. सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास नांदेड़-वसमत महामार्गावरील एका पेट्रोल पंपा जवळ मध्यप्रदेशची पासिंग असलेला ट्रक दिसून आला. त्यावरून पोलिसांच्या पथकाने ट्रकचालकाचे चौकशी सुरू केली.

या चौकशीमध्ये चालकाने ट्रकमध्ये भंगार साहित्य असल्याचे सांगितले. मात्र ट्रकचालक खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ट्रक मधील साहित्याची तपासणी सुरू केली. यामध्ये ट्रकच्या बाजूने चप्पल बुटाचे बॉक्स व इतर भंगार साहित्य आढळून आले. त्यानंतर भंगार साहित्याच्या व इतर बॉक्सचा बाजूला असलेल्या सुमारे 100 पोत्यांमध्ये गुटखा भरल्याचे दिसून आले. पोलिसांनी गुटख्याची सुमारे शंभर पोती जप्त केले असून या गुटख्याची किंमत वीस लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी सदर ट्रक जप्त करून वसमत शहर पोलीस ठाण्यात आणला आहे. याप्रकरणी पहाटेपर्यंत चौकशी सुरू होती. मध्य प्रदेशातून हा ट्रक गुटखा घेऊन वसमत शहरात आला असल्याचे प्राथमिक चौकशी मध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता हा गुटखा वसमत शहरामध्ये कोणाकडे आणण्यात आला होता याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. तसेच या घटनेची माहिती परभणीच्या अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतरच नेमका किती रुपयांचा गुटखा आहे हे स्पष्ट होणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gutkha seized in vasmat