...म्हणून औरंगाबादला ‘हमदर्द’ची पसंती

Hamdurd-Society
Hamdurd-Society

औरंगाबाद - पोषक हवामान, सुपीक जमीन आणि दळणवळणाची साधने औरंगाबादसाठी जमेची बाजू ठरल्या होत्या; मात्र व्यवहारात झालेल्या ‘डोकेदुखी’मुळे पैठण क्षेत्रात हाती घेतलेले ऊस लागवडीचे क्षेत्र अधांतरी आहे. या ठिकाणी पाच कोटी रुपये खर्चून ठिबक सिंचन प्रकल्प उभारण्याचा विचारही आता ‘हमदर्द’ने थंड बस्त्यात टाकून दिला आहे. 

वर्ष १८०२ मध्ये स्थापन झालेल्या हमदर्द उद्योगाने तब्बल सव्वाशे वर्षे दिल्ली आणि परिसरात व्यवसाय केल्यानंतर येथून विस्ताराचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने आमंत्रण दिल्यानंतर नागपूर आणि औरंगाबादपैकी एका ठिकाणाची निवड करायची होती. औरंगाबादेतील वातावरण अधिक पोषक असल्याने हा कारखाना शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत उभारण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. त्यासाठी प्रादेशिक कार्यालयाने या उद्योगासाठी चार एकर जागा हस्तांतरित केली होती. याबाबत प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी त्यांच्याशी एमआयडीसीकडून करार केला होता. पाचशे कोटींपैकी दीडशे कोटी गुंतविलेल्या ‘हमदर्द’ला काही कटू अनुभव आल्याने त्यांनी उर्वरित साडेतीनशे कोटींची रक्कम घेऊन माघारी फिरण्याचा विचार केला आहे. 

पैठणमध्ये दहा किमी लाईन
पैठण तालुक्‍यात सव्वाशे एकर जागा विकत घेणाऱ्या ‘हमदर्द’ला उसाची प्रचंड गरज आहे. त्यानुसार येथे उसाची लागवड करण्यात आली. पाण्याची गरज लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून येथे पाण्यासाठी दहा किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकली आहे; मात्र आता या प्रकल्पाकडे फारसे लक्ष दिले जात नसून, पाणी वाचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन प्रकल्पालाही ब्रेक लागला आहे.

एमआयडीसीचे फोन खणखणले
हमदर्दने माघारी फिरण्याचा विचार केल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच उद्योगजगत आणि सोशल मीडियावरही याचे तीव्र पडसाद उमटले. अनेक लोकप्रतिनिधींनी याची विचारणा करण्यासाठी एमआयडीसी कार्यालयाशी संपर्क साधल्याने तेथे फोन खणखणले. एमआयडीसीनेही या विषयाची तत्काळ दखल घेत स्थानिक प्रशासन, तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करीत कायद्याच्या चौकटीत राहून ‘हमदर्द’ला मदत करावी लागेल, असे विभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या प्रकरणात लक्ष देऊन आपणही या प्रकल्पाला औरंगाबादेतून जाऊ देणार नाही, तसे प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रशांत बंब म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com