‘हमदर्द’ला डोकेदुखी!

आदित्य वाघमारे 
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - अमेरिका आणि अन्य राष्ट्रांसाठी शेंद्रा येथे प्लॅंट उभारण्याच्या कामाला प्रख्यात कंपनी ‘हमदर्द’ने ब्रेक लावला आहे. औरंगाबादेत व्यवहारातून झालेल्या डोकेदुखीमुळे कंपनी ५०० कोटींची गुंतवणूक काढून घेण्याचा विचार करीत असल्याची माहिती ‘हमदर्द’तर्फे देण्यात आली. हा प्रकल्प गेल्यास पाचशे थेट, तर अडीच हजार अप्रत्यक्ष रोजगारांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. 

शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत चार एकर जागेवर हमदर्द कंपनीचा कारखाना उभारण्याचा सामंजस्य करार ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१७’ मध्ये झाला होता. त्यानुसार या कारखान्याला आवश्‍यक असलेली जडीबुटी उगविण्यासाठी सुमारे सव्वा तीनशे एकर जागा औरंगाबादच्या दोन तालुक्‍यांत घेतली होती. या व्यवहारादरम्यान आलेले कटू अनुभव ‘हमदर्द’साठी डाकेदुखीचे ठरले आहेत. त्यामुळे पाचशेपैकी दीडशे कोटींची गुंतवणूक करून काम सुरळीत करता येत नसेल तर औरंगाबाद सोडलेलेच बरे, असा विचार सध्या हमदर्द कंपनी करीत आहे. कारखाना उभारण्यासाठी आवश्‍यक असलेली बहुतांश रक्कम वितरित करण्यात आली असली तरी आता इमारत उभारणी आणि यंत्रणा खरेदीसाठी लागणारी रक्कमही कंपनीने प्रदान केली आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादेतून माघारी जाणे परवडणारे नसले तरी भविष्यातील धोके पाहता माघार घेतलेली बरी, असा विचार सध्या ‘हमदर्द’च्या संचालक मंडळात सुरू आहे.

शासकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार 
औरंगाबादेतील आलेल्या अनुभवाला वाचा फोडण्यासाठी ‘हमदर्द’तर्फे उद्योग सहसंचालक, एमआयडीसीचे विभगीय अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आदींना भेटून या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती ‘हमदर्द’तर्फे देण्यात आली. कंपनीला औरंगाबादेत अजून सुमारे एक हजार एकर जागेची खरेदी करायची होती. याशिवाय शेतकऱ्यांच्या बांधाहून पीक खरेदी करण्याचाही विचार कंपनीचा होता, तो आता थांबला आहे. 

औरंगाबाद आणि परिसरातील ५०० कोटींच्या कारखान्यातून पाचशे जणांना रोजगार मिळू शकतो. एप्रिल २०१९ पासून उत्पादन सुरू करण्याचा विचार होता; पण औरंगाबादेतील कटू अनुभवांतून येथील गुंतवणूक काढवी का, असा विचार सध्या हमदर्द करीत आहे. 
- शमशाद अली, सरव्यवस्थापक, हमदर्द लॅबॉरेटरीज

Web Title: Hamdurd Society Construction work stop