file photo
file photo

नांदेडला भक्ताविना हनुमान जयंती साजरी

नांदेड - महाबली संकटमोचक हनुमान जयंती बुधवारी (ता. आठ) पहिल्यांदाच भक्ताविना नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अनेक हनुमान मंदिरात साजरी करण्यात आली. कोरोनामुळे लाॅकडाउन असल्याने भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच मारुतीचे दर्शन घ्यावे लागले.

कोरोनामुळे जगभरात परिस्थिती बिकट बनत चालली असून अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात देखील ता. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. नुकतीच रामनवमी साजरी करण्यात आली होती ती देखील आपआपल्या घरात तसेच मंदिरातही पुजारी आणि एक दोघांच्या उपस्थितीत. आता हनुमान जयंती देखील अशाच पद्धतीने बुधवारी साजरी करण्यात आली. 

संकट दूर होण्यासाठी साकडे
हनुमान भक्तांनी संचारबंदीचे नियम पाळत घरीच विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन हनुमान जयंती साजरी केली. देशावरील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी श्रीरामभक्त बजरंगबलीला साकडे घालण्यात आले. या वर्षी लाॅकडाउनमुळे मंदिरांतील गर्दी टाळण्यासाठी पुजारी व इतर दोघा तिघांनी श्री हनुमान मूर्तीची विधिवत पूजाअर्चा केली. त्यानंतर मंदिरांचे दार बंद करण्यात आले.

दोन चार भक्तांच्या उपस्थितीत उत्सव 
हनुमान जयंतीनिमित्त सुंदरकांड, हनुमानाष्टक, हनुमान चालिसाचे पठण करून भारतावरील कोरोनाचे संकट टाळण्याचे तसेच या लढ्यात झोकून दिलेल्या सर्वांना निरोगी ठेवण्यासाठी संकट मोचक हनुमानाला साकडे घातले. शहरातील शिवाजीनगर, विजयनगर, पावडेवाडी नाका, हनुमानगड, वजिराबाद, जुना मोंढा, जुने नांदेड, गाडीपुरा, सिडको, हडको, वाडी, पूर्णा रोड, आनंदनगर, अशोकनगर, मालेगाव रोड, भावसार चौक, तरोडा आदी भागातील हनुमान मंदिरात मोजक्या दोन चार भक्तांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला.

भाविकांनी घेतले दुरुन दर्शन
दरवर्षी शहरासह जिल्हाभरात गावोगावी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होते. विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. लोकप्रतिनिधी देखील पुढाकार घेतात. ग्रामिण भागातही उत्साहात हनुमान जयंती साजरी होते. मात्र, यंदा कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने मंदिरे देखील बंद करण्यात आली आहेत. त्याचा परिणाम हनुमान जयंतीवर दिसून आला. अनेक मंदिरांसमोर फलक लावून सूचना देण्यात आली होती. तसेच महापूजा, आरती होताच मंदिरे बंद करण्यात आली. त्यामुळे भाविक कमी संख्येने उपस्थित होते. जे काही आले त्यांनी दुरूनच दर्शन घेतले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com