वंचिताना जगण्याचे बळ देणारी ‘एचएआरसी’ संस्था

File photo
File photo

परभणी : आई-वडीलांच्या चुकीमुळे जन्मत:च एचआयव्ही सारखा दुर्धर आजार घेऊन वाढणाऱ्या निरागस मुलांना जेव्हा त्यांचे कुटूंब वाऱ्यावर सोडते, अशा वेळी त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा निराधार मुलांचा केवळ कोरडी सहानभुती देऊन चालत नाही तर त्यांना द्यावी लागते ती मायेची उब आणि पायावर उभे राहण्याचे बळ. शिक्षणासोबतच पुढे कोणावरही निर्भर राहण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी रोजगाराची साधने आणि व्यावसायीक शिक्षण यावर भर देण्याचा विडा येथील होमीयोपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने उचलला आहे.

एचआयव्ही एड्स संक्रमित्यांच्या विशेषतः बालकांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन संबंधित मूलभूत प्रश्नांवर कार्य करण्यासाठी स्थापन केलेल्या होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्या सुरू झालेल्या कार्यास यंदा ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. सुरवातीला केवळ एचआयव्ही संक्रमिताना मोफत होमिओपॅथिक औषधोपचार देण्यासाठी व एचआयव्ही एड्स विषयावर संशोधन करावे या उद्देशाने सुरू झालेले हे कार्य आज सर्वव्यापक झाले आहे. परभणीतील अनुदानित जीवनरेखा बालगृहातील अत्यंत वाईट परिस्थितीत असलेल्या १३ मुलांचे सेवालय हसेगाव (जि.लातूर) येथे स्थलांतर करुन त्यांना वैद्यकीय उपचारासोबत चांगले पुनर्वसन, शिक्षण विषयक गरजा पूर्ण करून ‘एचएआरसी’ संस्थेने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. 

७० मुलांचे स्वीकारले पालकत्व
या प्रकल्पातील ७० मुलांचे पालकत्व स्विकारत पुनर्वसन, वैद्यकीय उपचारासाठी मदत करण्यासोबतच त्यांच्यातील कलेला वाव देण्यासाठी हॅपी म्युझिक शोची स्थापना केली. त्यामाध्यमातून आर्थीक मदत उभी केली. स्वयंरोजगार व प्रशिक्षणासाठी शिलाई मशीन, २ खोलीचे बांधकाम, सलग ३ वर्ष या मुलांनी श्रमातून पिकवलेल्या केशर आंब्यांची विक्री, या मुलांनी घडवलेल्या राखी, गणेश मूर्ती प्रदर्शन व विक्री, ३ एचआयव्ही संक्रमित जोडप्यांच्या विवाह आदी सर्व उपक्रमांचे आयोजन करून आजवर मागील ४ वर्षात देणगी, रोख व वास्तुस्वरूपात मिळून १५ लाखांची मदत ‘एचएआरसी’ संस्थेने सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर येथे केली आहे. हे सर्व कार्य करतांना जिथे जिथे एचआयव्ही संक्रमित अनाथ बालके आहेत, तिथे मदत करायची हे तत्व बाळगून मागील दोन वर्षात पालवी प्रकल्प पंढरपूर, सूर्योदय एड्स बालगृह अकोला, इंफॅन्ट इंडिया संस्था बीड येथे शिक्षण व पुनर्वसन पर गरजांसाठी मदत केली आहे.

स्वयंरोजगार व प्रशिक्षण
स्पर्श सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पही उभारणी करून तीन एचआयव्ही संक्रमित अनाथ मुलींना मदत करून त्यांना सॅनिटरी पॅड निर्मितीचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविले आहे. तसेच ५ एचआयव्ही संक्रमित अनाथ मुलींना शिलाई मशीन व पिको फॉल मशीन तर तिघांना संगणक देऊन स्वत:च्या पायावर उभे केले आहे.

समाजातील दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना स्वावलंबी होण्यासाठी व स्वयंरोजगार व प्रशिक्षणासाठी भविष्यात जी मदत लागेल ती ‘एचएआरसी’ संस्थेतर्फे पुरविली जाईल. सर्व रुग्णांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन नियमितपणे उपचार, पोषक व संतुलित आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या सुख दुःखात एचएआरसी संस्था सदैव आपल्या सोबत आहे.
- डॉ.पवन चांडक,अध्यक्ष एचएआरसी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com