मुख्यमंत्री टाईमपास करत आहेत- हर्षवर्धन जाधव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. आत्महत्याही होत अाहेत; पण सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे जाधव यांनी राजीनामा देऊन राज्यात ‘मन परिवर्तन समूपदेन यात्रा’ सुरू केली आहे. ही यात्रा शनिवारी लातूरात अाली होती. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जाधव यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

लातूर : आम्ही मराठा समाजाला आरक्षण लागू केले, असा अध्यादेश सरकारने प्रसिद्ध केल्याशिवाय मराठा अांदोलक शांत बसणार नाहीत. लोकांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. पण सरकार आणि मुख्यमंत्री केवळ टाइमपास करत अाहेत. तरुणांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठीही सरकार पावले उचलताना दिसत नाही. केवळ बघ्याची भूमिका बजावत आहे, अशी टीका आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी केली. हिंमत असेल तर सरकारने आरक्षणमुक्त समाज तयार करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. आत्महत्याही होत अाहेत; पण सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे जाधव यांनी राजीनामा देऊन राज्यात ‘मन परिवर्तन समूपदेन यात्रा’ सुरू केली आहे. ही यात्रा शनिवारी लातूरात अाली होती. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जाधव यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

जाधव म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आत्महत्यांचे सत्र थांबेल, असे वाटत नाही. आता तर एकाचे पाहून दुसरा आत्महत्या करू लागला आहे. कारण मराठा समाजातील तरुण निराशेच्या गर्तेत सापडला आहे. त्यांना बाहेर काढण्याची खरी जबाबदारी सरकारची आहे. राज्यभरातील सर्व रूग्णालयात समूपदेशक असतात. त्यांची मदत घेऊन तरुणांच्या मनातील निराशा सरकारने घालवायला हवी होती. पण सरकार असे काहीही करताना दिसत नाही. तेच इतर राजकीय पक्षांचेही आहे. त्यामुळे अाम्ही निराशेत सापडलेल्या तरुणांच्या समूपदेशनासाठी मराठवाड्यात सर्वत्र दौरे करत आहोत. हे काम कोण्या एकट्याने होणार नाही. यात सरकार आणि इतर राजकीय पक्षांनीही सहभागी व्हायला हवे. राजकारणापलिकडे जाऊन माणूसकीच्या नात्याने या प्रश्‍नाकडे पाहायला हवे.’’

सत्तेत असताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. आता भाजप आणि शिवसेना वेळकाढूपणा करत अाहे. आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. सत्तेचा वाट्टेल तसा उपयोग करत आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न करत अाहे. मग सरकारमध्ये हिंमत असेल तर आरक्षणमुक्त समाज तयार करावे. कोणालाही आरक्षण देऊ नये. मात्र सरकार कोणाचेही येवो, ते आजवर केवळ मतांसाठी या विषयाकडे पाहत अाले आहेत. त्यामुळेच तर आरक्षणाचा प्रश्‍न इतका चिघळला अाहे. हे सर्व राजकीय पक्षांचे पापच अाहे, असेही जाधव यांनी सांगितले.

Web Title: harshawardhan jadhav criticise on cm fadanvis