हरवलेल्या दुचाकीसाठी तो स्वत:च बनला पोलिस! : Video

मनोज साखरे
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

चोरांचा सुळसुळाट एवढा वाढला, की लोक आता दुचाकीला हॅंडल लॉकसोबतच चाकालाही साखळदंड व कुलूप लावत आहेत. परंतु या नाही तर त्या असे म्हणत चोरही दुचाकीचोरीचा सपाटा लावतच आहेत.

औरंगाबाद - एरवी चोरी झाली, की आपण रीतसर पोलिस ठाण्यात तक्रार देतो. तपासाला अनेक दिवसांचा कालावधी लागतो. परंतु चोरी झालेली दुचाकी स्वत:च सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून शोधलीच; पण या पठ्ठ्याने दुचाकी चोरणाऱ्यालाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 

औरंगाबाद शहरात दरदिवशी दुचाकीचोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. एकाच दिवशी चार ते सहा दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हेही पोलिस ठाण्यात यापूर्वी नोंद झाले आहेत. चोरांचा सुळसुळाट एवढा वाढला, की लोक आता दुचाकीला हॅंडल लॉकसोबतच चाकालाही साखळदंड व कुलूप लावत आहेत. परंतु या नाही तर त्या असे म्हणत चोरही दुचाकीचोरीचा सपाटा लावतच आहेत.

दरदिवशी तीन-चार तर कधी सहा-आठ दुचाकी चोरी झाल्याची उदाहरणेही शहरात घडली आहेत. पोलिसांच्या काही कारवाया सोडल्यास दुचाकी चोऱ्या झाल्या तर फारशी उकलही होताना दिसत नाही. एकदा दुचाकी चोरी झाली की ती परत येणार नाही, अशीच स्थिती आहे. चोरी झालेल्या दुचाकीचा सोशल मीडियाद्वारे शोध लागल्याची काही उदाहरणे आहेत. परंतु, आसेफिया कॉलनीतील सोहेल सिद्दीकी यांनी पोलिसांसारखाच शोध घेत दुचाकी तर मिळविलीच पण चोरी करणाऱ्या संशयितालाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Aurangabad News
औरंगाबाद : पहिला संशयित दुचाकीस्वार पुढे गेल्यानंतर दुसरा बुलेट सुरु करुन नेताना.

काय म्हणता - प्लेगची महामारी पुन्हा येणार? 

याबाबत स्वत: याच तरुणाने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली व सीसीटीव्ही फुटेजही पाठविले. सोहेल यांनी त्यांची बुलेट 19 नोव्हेंबरला रात्री घरासमोर लावली. त्यानंतर ते झोपी गेले. पहाटे उठल्यानंतर घरासमोर बुलेट नव्हती. ती चोरी झाल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रारही दिली. 

मग काय केले? 

सोहेल तक्रार देण्यावरच थांबले नाहीत. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीद्वारे फुटेज काढले. ते बारकाईने पाहिले तेव्हा 20 नोव्हेंबरला पहाटे तीनच्या सुमारास एकाच दुचाकीवरून दोघे आले. त्यांनी आजुबाजूला कुणी आहे का, याची चाचपणी केली. नंतर दुचाकीवरून एकजण खाली उतरला. त्याने काही सेकंदात सोहेल यांची बुलेट सुरू केली व ती घेऊन साथीदारासह तेथून धूम ठोकली.

 असं कसं झालं हो - संसाराचा डाव सुरु होण्यापुर्वीच मोडला.. 

हा प्रकार सीसीटीव्हीत पाहिल्यानंतर सोहेल यांनी स्वत:च दुचाकीचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीतील वर्णनानुसार संशयिताचा शोध घेत त्याचे घरही गाठले. तेथे दुचाकी दिसल्याने ती घेत त्याने संशयित तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दुचाकी चोरी केल्याची कबुलीही त्या संशयिताने दिली. तो शहरातील दुचाकी चोरून चाळीसगाव (जि. जळगाव) येथे विक्री करीत असल्याचेही सोहेल यांनी सांगितले. 

त्यांनी केले आवाहन 

सोहेल यांनी हिंदीतून एक संदेश दिला. त्याचा मराठी सारांश असा ः आपणा सर्वांना विनंती आहे की, हा व्हिडिओ पुढे पाठवा आणि ज्यांची त्या भागातून व इतर ठिकाणांहून दुचाकी लंपास झाली असेल त्यांनी बेगमपुरा पोलिसांशी संपर्क साधा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He becomes a policeman for a lost bike!