Beed : मुंडेंचे निदान, आता शस्त्रक्रियांचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Campaign Commissioner Tukaram Mundhe health center inspection

Beed : मुंडेंचे निदान, आता शस्त्रक्रियांचे आव्हान

बीड : मुख्यालयी राहण्याचे वावडे, तालुका- जिल्ह्याच्या ठिकाणांवरून आरोग्य संस्थांचा कारभार, ओपीडीलाही आल्यासारखे करुन जाणे अशा एक ना अनेक आजारांनी आरोग्य विभाग जर्जर झाला आहे. या आजारांचे आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ‘निदान’ केले आहे. यावर कडक कारवाईची शस्त्रक्रिया करण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.

तुकाराम मुंडे यांनी गुरुवारी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. तसेच, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आरोग्य यंत्रणेच्या कामाचा आढावाही घेतला. श्री. मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील उणिवांबाबत ‘सकाळ’ने खास वृत्त प्रसिद्ध केले होते. याचीही दखल श्री. मुंडे यांनी घेतली.

पाहणी व बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. नॉर्मल डिलीव्हरीही रेफर केल्या जातात, अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, हा बेशिस्तपणा व कामचुकारपणा अजिबात जमणार नाही. काम नीट करा, अथवा नोकऱ्या सोडा, असा दम आरोग्य विभागाचे अभियान आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भरला.

श्री. मुंडे यांनी सुरवातीला सिव्हीलमधील फिव्हर क्लिनिक, ईएनसी रुम, डिलिव्हरी वाॅर्ड आदींसह विविध भागांत पाहणी केली. यावेळी रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. बाहेरुन औषधी लिहून देणे, बाहेरुन रोग निदान करायला लावल्याबद्दलही त्यांनी सुनावले.

यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, आरोग्य उपसंचालक डॉ. श्रीमती चामले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख आदींसह वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

सूचनेनंतर आता काय?

आढावा बैठकीत काही ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांतून रुग्णांचे रेफर, नॉर्मल डिलिव्हरी रेफरच्या प्रकाराबद्दल तुकाराम मुंडे यांनी चांगलेच सुनावले. अशा अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त वेतनवाढी, घरभाडे भत्ता बंद करा, त्यांचे क्वार्टर काढून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, मुख्यालयी न राहणारे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षकांवर अतिरिक्त इन्क्रिमेंट व घरभाडे भत्ता बंद करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

तसेच, वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही आपल्या ड्यूटी चोख पार पाडाव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. सर्वांची बायोमेट्रीक उपस्थिती पडताळूनच त्यांचे वेतन अदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, बायोमेट्रीकवर आरोग्य विभागाने लाखो रुपयांचा खर्च केला असला तरी अनेक ठिकाणी ‘सोयीसाठी’ ही यंत्रणा बंद पडली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपसांत दिवसच वाटून घेतलेले आहेत. आतापर्यंत याकडे डोळेझाक करुन वेतन काढले जाते. आता मुंडेंच्या सूचनेनंतर काय होणार, याकडेही लक्ष लागले आहे. मुंडेंनी अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या सूचना दिल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होते का व यावर इन्क्रिमेंट व घरभाडे भत्ता बंदची कारवाई होते का? हेही पहावे लागणार आहे.

टॅग्स :BeedHealth Department