
एक फलक उमरगा येथील आरोग्यनगरीच्या कोपऱ्यात लावण्यात आल्यानंतर संतप्त जमावाने शनिवारी (ता.पाच) तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन जमावाकडून घोषणाबाजी करण्यात आली.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : आरोग्य विभागाने कुष्ठरोग आणि क्षयरोग शोध मोहिम २०२० अंतर्गत जनजागृतीसाठी जिल्ह्यात उर्दू भाषेतून फलक लावण्यात आले आहेत, असाच एक फलक उमरगा येथील आरोग्यनगरीच्या कोपऱ्यात लावण्यात आल्यानंतर संतप्त जमावाने शनिवारी (ता.पाच) तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन जमावाकडून घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे आरोग्य विभागाने फलक एका तासाच्या आत हटविले आहे.
याबाबतची माहिती अशी की, जिल्हा आरोग्य विभागाने एक ते ३१ डिसेंबर कालावधीत कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांची शोध मोहिमेविषयी व्यापक जनजागृती होण्यासाठी मराठी व उर्दू भाषेत सूचना व रोगांच्या लक्षणाविषयीची माहिती फलक शहरातील आरोग्य विभागाच्या कोपऱ्यावर लावले होते. महाराष्ट्राची अस्मिता जागवणाऱ्या मराठी भाषेत माहिती फलक असावे असा आग्रह करत नागरिक आणि हिंदु संघटना यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार विलास तरंगे यांना निवेदन दिले आणि उर्दु भाषेतील फलक एक तासाच्या आत काढण्यात यावे.
अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला. श्री. तरंगे यांनी याबाबत आरोग्य विभागाला कळविले. त्यानंतर फलक काढण्यात आले. या वेळी माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने, प्रवीण मुगळे, सिद्धेश्वर माने, अमर वरवटे, प्रसन्ना पुदाले, काशीनाथ राठोड, शाहूराज माने, सचिन गाडे, आकाश चव्हाण, संतोष राठोड, राहुल सुरवसे, पंकज मोरे, रुद्रा स्वामी, बालाजी मदरे, महादेव सलके, विष्णू पांगे, अमर करके, संकेत कुलकर्णी, धीरज गायकवाड, अभिषेक जेवळीकर, विशाल सोंनकवडे, सूरज सोनटक्के, पंकज बेलकोने, श्रीधर ढगे आदी उपस्थित होते.
कुष्ठरोग व क्षयरोग आजाराविषयी लोकांमध्ये व्यापक जनजागृती होण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन्ही भाषेत जनजागृती फलक संपूर्ण जिल्ह्यात लावण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सर्व समाजात या आजाराविषयी जनजागृती व्हावी. केवळ या हेतूने फलक लावण्यात आले आहेत.
- डॉ.रफिक अन्सारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी
संपादन - गणेश पिटेकर