औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी तासभर जोरदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

शहरात सोमवारच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. आठ) जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बीड बायपास परिसरात गारांचा पाऊस पडला. जोरदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. 

औरंगाबाद - शहरात सोमवारच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. आठ) जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बीड बायपास परिसरात गारांचा पाऊस पडला. जोरदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. 

यंदाच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने धूम केली आहे. रोज किंवा एक दिवसाआड जोरदार पाऊस शहराला झोडपून काढले. मंगळवारी सकाळी ऊन पडलेले असतानाच दुपारनंतर आभाळ भरून आले. साधारण चारच्या सुमारास धुवाधार पावसाला सुरवात झाली. सिडको, हडको, गारखेडा परिसर, रेल्वेस्टेशन परिसर, विद्यापीठ परिसर असा चौफेर पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वारे वाहत असतानाच मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसात अवघ्या दहा मिनिटांमध्ये शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अनेक सखल भागात पाणी शिरले होते. शहरातील पुंडलिकनगर, हनुमाननगर, गारखेडा परिसर, सिडकोतील आझाद चौक, माता मंदिर चौक, रेल्वेस्टेशन परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. शहानूरवाडी येथील देवानगरी परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. परतीचा पाऊस समाधानकारक होत असल्याने शहर व परिसरातील पिकांची परिस्थिती सुधारल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. 

दोन ठिकाणी पडली झाडे 
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरात दोन ठिकाणी झाडे पडली, तर एका ठिकाणी तारांवर झाडाची फांदी कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आरटीओ कार्यालयाजवळ गोविंदनगर येथे रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती कळविली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाड बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, एमआयटी हॉस्पिटलजवळ झाडाची फांदी विजेच्या तारांवर पडली; तसेच वरद गणेश मंदिर परिसरात देखील एक झाड कोसळले. या ठिकाणी देखील अग्निशमन विभागाने मदतकार्य केले.

अर्ध्या शहराचा वीजपुरवठा खंडित  
औरंगाबाद : शहरात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील काही भागांत मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा सुरळीत केला. 

कर्णपुऱ्याकडे येणाऱ्या वीजवाहिनीवर दोन ते तीन ठिकाणी झाडे कोसळल्याने दुपारी साडेचारच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. कर्णपुरा यात्रेतील दुकानांचे पत्रे उडून वाहिनीवर पडले. तसेच वाऱ्यामुळे स्टॉल पडल्यामुळे सुरक्षेसाठी वायर काढावे लागले. दुरुस्तीची कामे केल्यावर साडेपाचनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. पावसामुळे पडेगाव, सातारा, वाल्मी, रेल्वेस्टेशन उपकेंद्रावरील परिसराचा वीजपुरवठा अर्धा ते पाऊण तास बंद राहिला. शिवाजीनगर, सूतगिरणी, पन्नालालनगर उपकेंद्रावरील भागातही २० मिनिटे वीज खंडित होती. बायजीपुरा उपकेंद्रातील निजामुद्दीन वाहिनीवर बिघाड झाल्याने इंदिरानगर, बायजीपुरा, नवाबपुरा, रेंगटीपुरा, संजयनगर, बसय्येनगर भागात सहापासून सुमारे दोन तास वीज नव्हती. सिडको एन-पाच उपकेंद्रात येणाऱ्या ३३ केव्ही वाहिनीवर बिघाड झाल्याने एन-पाच ते एन-१२ पर्यंतच्या परिसरात सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता. चिकलठाणा परिसरात जवळपास २५ ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने एमआयडीसी, एन-एक, नारेगाव, ब्रिजवाडी परिसरात बराच काळ वीजपुरवठा खंडित राहिला. पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळलेल्या झाडांचा दुरुस्तीत अडथळा येत होता. महावितरणचे अभियंते व कर्मचारी उशिरापर्यंत दुरुस्तीसाठी प्रयत्न करीत होते.

आष्टी तालुक्‍यात वादळासह पाऊस
कडा - आष्टी तालुक्‍यातील कानडी खुर्द, पिंपळगाव दाणी, आनंदवाडी, वाहिरा येथे काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह एक तास जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले, भिंती पडल्या, विद्युत खांब पडले; तसेच बरीच झाडे उन्मळून पडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in aurangabad