मराठवाड्यात 189 मंडळांत अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - महिनाभराच्या खंडानंतर पावसाने दोन दिवस मुक्‍काम करीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वदूर हलक्‍या, मध्यम ते धो-धो स्वरूपात हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपर्यंत मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील 189 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. सकाळपासून मात्र पावसाने उसंत घेतली.

यंदा वेळेवर व चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच पेरणी केली; मात्र नंतर पावसाने दगा दिल्याने पिके करपू लागली होती. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी (ता. 15) रात्री दाखल झालेला पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत सुरूच होता. सकाळनंतर पाऊस थांबला.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील 421 मंडळांपैकी सहा जिल्ह्यांतील 189 मंडळांत 65 मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 65 मिलिमीटरच्या पुढे पाऊस झाल्यास त्यास अतिवृष्टी संबोधले जाते. यामध्ये औरंगाबाद- 54, जालना- 45, परभणी- 24, हिंगोली- 16, नांदेड- 41, बीड- नऊ अशा सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. 129 मंडळांत 75 ते 100 मिलिमीटर, तर 128 मंडळांत शंभरहून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

Web Title: Heavy Rain in Marathwada