उस्मानाबादमध्ये जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

उस्मानाबाद - सलामीच्या पावसाने उस्मानाबाद शहराला चांगलेच झोडपले. शुक्रवारी (ता. एक) पहाटे शहरात अतिवृष्टी झाली असून, तब्बल ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय परंडा, भूम आणि उमरगा तालुक्यातही सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. यामुळे शेतातील मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. 

उस्मानाबाद - सलामीच्या पावसाने उस्मानाबाद शहराला चांगलेच झोडपले. शुक्रवारी (ता. एक) पहाटे शहरात अतिवृष्टी झाली असून, तब्बल ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय परंडा, भूम आणि उमरगा तालुक्यातही सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. यामुळे शेतातील मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. 

जून महिन्यात पावसाळा सुरू होतो. दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी पहाटे दोनच्या सुमारास पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू झाला. बहुतांश नागरिक झोपेत होते. विजेचा कडकडाट जोराचा होता. त्यामुळे अनेकांची झोपमोड झाली. सुमारे दोन तास पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. पहिल्याच पावसात शहरातील नाल्या ओसंडून वाहत होत्या. पहाटे साडेपाचपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. शहरात तब्बल ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

भूम, परंड्यालाही झोडपले 
भूम आणि परंडा तालुक्यातही सर्वदूर पाऊस झाला आहे. सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला असून परंडा तालुक्यात सरासरी ३५ तर भूम तालुक्यात सरासरी ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भूम मंडळातही अतिवृष्टी झाली असून ७८ मिलीमीटर पावस झाला आहे. उमरगा तालुक्यातही सर्वदूर सरासरी २९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मंगरुळ (ता. तुळजापूर) मंडळाला पावसाने हुलकावणी दिली असून, इतर मंडळात जेमतेम चार- सहा मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

शेतातील मशागतीच्या कामांना वेग 
गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी केली नव्हती. जमिनीचा पोत घसरल्याने नांगरणी करता येत नव्हती. ट्रॅक्टरचा नांगर चालविणेही कठीण जात होते. आता पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने जमिनीचा कडकपणा कमी झाला असून नागरणी सोपी होणार आहे. शेतातील इतर मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. 

Web Title: Heavy rain in Osmanabad