अवकाळी पाऊस, गारपिटीचा उस्मानाबाद जिल्ह्याला तडाखा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

उस्मानाबाद - शहर व जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. कसबेतडवळे भागात गारपीटही झाली. काढणी केलेल्या ज्वारी व उघड्यावर असलेल्या कडब्याला या पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

जिल्ह्याच्या काही भागांत दुपारी चारच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले. साडेचारच्या सुमारास कसबेतडवळे (ता. उस्मानाबाद) परिसरात काही वेळ गारांचा पाऊस झाला. कळंब तालुक्‍यातील गौर, आंदोरा येथे सरी कोसळल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास उस्मानाबाद शहराच्या काही भागांत, तसेच ढोकी परिसरात पावसाने हजेरी लावली.

कसबे तडवळेसह, कोंबडवाडी, गोपाळवाडी, वाकरवाडी, दूधगाव, खामगाव, जवळे या परिसरांत सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह सुमारे पंधरा मिनिटे गारांचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी साचले. काही शेतकऱ्यांनी ज्वारीची काढणी करून भरडण्यासाठी कणसे शेतातच टाकली आहेत, तर काहींनी कडबा शेतात अस्ताव्यस्त टाकलेला आहे. पावसामुळे कणसे व कडबा भिजल्याने नुकसान झाले.

ईटसह परिसरात दुपारी वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह झालेल्या अवकाळी पावसाने आठवडे बाजारातील व्यापारी, ग्राहकांची तारांबळ उडाली. पालेभाज्यांचे नुकसान झाले. परिसरातील वीजपुरवठा सुमारे दोन तास खंडित करण्यात आला होता.

Web Title: heavy rain in osmanabad