उमरगा तालुक्यात अतिवृष्टी; शेतीचे मोठे नुकसान

अविनाश काळे
शनिवार, 23 जून 2018

उमरगा, मुळज व नारंगवाडी मंडळ विभागात ढगफुटी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील जवळपास अडीचशे घरात पाणी घुसल्याने संसारोपयी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून शेत शिवारातुन आलेल्या पावसाचे पाणी शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर थांबल्याने रात्री दोन नंतर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पळसगांव साठवण तलाव फुटल्याची माहिती सांगण्यात आली.

उमरगा : उमरगा शहर व तालुक्यात शुक्रवारी (ता. २२) रात्री झालेल्या अतिवृष्टिने संपूर्ण शहर जलमय झाले असून शेत-शिवारातील बांध फुटुन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पंधरा दिवसात दुसऱ्यांदा पावसाने झोडपले.  

उमरगा, मुळज व नारंगवाडी मंडळ विभागात ढगफुटी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील जवळपास अडीचशे घरात पाणी घुसल्याने संसारोपयी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून शेत शिवारातुन आलेल्या पावसाचे पाणी शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर थांबल्याने रात्री दोन नंतर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पळसगांव साठवण तलाव फुटल्याची माहिती सांगण्यात आली.

शुक्रवारी सांयकाळी सहा पासुन ढगाळ वातावरण होते, रात्री साडेआठ ते साडे अकरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. उमरगा मंडळ विभागात सर्वाधिक १४६ मिलीमीटर पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले होते.  राष्ट्रीय महामार्गावर गणेश चित्र मंदिरापासुन बाबा पेट्रोल पंपापर्यंत दोन फुटापर्यत पाणी वाहत होते. त्यामूळे रात्री अकरा ते एक पर्यंत वाहतूक ठप्प होती. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने हळुवार गतीने वाहतुक सुरू झाली. दत्त मंदिर परिसरातही पाणी घुसले, मदनानंद कॉलनीतील अनेक घरात व दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले. या कॉलनीतील घिसाडी समाजाचे भिमा रावसाहेब चव्हाण यांचे तात्पुरत्या स्वरूपातील घर व दुकान अतिवृष्टीच्या  पाण्यात पुन्हा वाहुन गेले, साड्याचा दोरखंड करून नागरिकांना बाहेर यावे लागले. संपूर्ण कुटुंबांना रात्र जागून काढावी लागली. मदनानंद कॉलनीतील अनेक घरात पाणी घुसले.

शहरातील मलंग प्लॉटमध्ये तर तलावासारखी स्थिती निर्माण झाली होती. तेथील पाण्याचा मोठा प्रवाह मुन्शी प्लॉट, साने गुरुजी नगर, पतंगे रोड भागातील घरात घुसल्याने नागरिकांना मध्यरात्रीपासून बाहेर थांबावे लागले. दरम्यान उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदगल स्वतः एकोंडी रोडवर निर्माण झालेल्या पाण्याची स्थिती पाहुन तातडीने रात्री साडेबाराच्या सुमारास जेसीबी मागवून घेतली व रस्ता फोडून पाण्याला वाट करून दिली. शहरात मोठ्या नाल्याचे बांधकाम नसल्याने व मान्सूनपूर्व कराव्या लागणाऱ्या कामात हलगर्जीपणा केल्याने निर्माण झालेल्या स्थितीबाबत नागरिकांनी पालिकेच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान अतिवृष्टीने उमरगा, नारंगवाडी, मुळज मंडळ विभागात शेतीचे बांध फुटुन मोठे नुकसान झाले आहे. कांही शेतकऱ्यांचे पेरणी केलेले क्षेत्र वाहुन गेले आहे.

तालुक्यातील मंडळ निहाय पाऊस असा : उमरगा -१४६ मुरुम -१९ , दाळींब - २४, मुळज-१४५ नारंगवाडी - ११५ एकुण सरासरी पाऊस ८९ .८मिली मीटर पाऊस 

Web Title: heavy rain in Umerga