रात्रीच्या वेळी रिपरिप पावसात मिलिंदसाठी ‘ते’ ठरले देवदूत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

औरंगाबाद - रात्रीची दहा, साडेदहाची वेळ...अतिशय वर्दळीचा जालना रोड... सेव्हन हिल उड्डाणपुलावरून भरधाव वाहणारी वाहने... वरून पावसाची रिपरिप अन्‌ उड्डाणपुलावर काही पथदिव्यांचा मिणमिणता उजेड... याचवेळी शहरातून चिकलठाण्याकडे जाणारी एक दुचाकी पावसाने निसरड्या झालेल्या पुलावर घसरली आणि दुचाकीचालक थेट लोखंडी अँगलवर आदळला आणि जबडा फाटला. घटना घडल्याच्या काही वेळातच तिथे चार-पाच तरुण दाखल झाले आणि त्या जखमी व्यक्‍तीला अवघ्या काही मिनिटांतच ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले.

औरंगाबाद - रात्रीची दहा, साडेदहाची वेळ...अतिशय वर्दळीचा जालना रोड... सेव्हन हिल उड्डाणपुलावरून भरधाव वाहणारी वाहने... वरून पावसाची रिपरिप अन्‌ उड्डाणपुलावर काही पथदिव्यांचा मिणमिणता उजेड... याचवेळी शहरातून चिकलठाण्याकडे जाणारी एक दुचाकी पावसाने निसरड्या झालेल्या पुलावर घसरली आणि दुचाकीचालक थेट लोखंडी अँगलवर आदळला आणि जबडा फाटला. घटना घडल्याच्या काही वेळातच तिथे चार-पाच तरुण दाखल झाले आणि त्या जखमी व्यक्‍तीला अवघ्या काही मिनिटांतच ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार सुरू झाले; मात्र तो कोण, कुठला काहीच माहिती नसल्याने नातेवाइकांचा शोध घेऊन रात्री १२ च्या सुमारास अपघातग्रस्त व्यक्‍तीच्या नातेवाइकांना ही बातमी कळली आणि त्यांनी धाव घेतली. जखमी व्यक्‍तीच्या तातडीने मदतीला जाणारे तरुण होते ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सचे सदस्य...!

मिलिंद लिहणार हा मुकुंदवाडीच्या प्रकाशनगरमध्ये राहतो. कुरिअर वाटण्याचे काम संपवून घराकडे जात असताना हा अपघात घडला. या भीषण अपघातात त्याचा जबडा अक्षरश: फाटला, डोक्‍याला गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर पडताच तात्काळ तिथे ॲड. अक्षय बाहेती, ऋषिकेश जैस्वाल, संदीप लिंगायत, अभिषेक कादी, पवन भिसे, आदित्य शर्मा पोचले आणि जखमीला घाटी दवाखान्यात दाखल केले. तोवर घाटीमध्ये इतर हेल्प रायडर्सनी त्याच्या उपचाराची तयारी करून वेदना होत होत्या की, त्याचे दोन्ही पाय धरून जबड्याला टाके द्यावे लागले. तोपर्यंत कागदपत्रांचे सोपस्कर पार पडण्यात आले. डॉक्‍टरांच्या मते, जखमी युवकाला जर हॉस्पिटलला पोचण्यात उशीर झाला असता तर त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. 

कुरिअर वाटपाचे काम करणाऱ्या श्री. लिहणारकडील निमंत्रणवरील फोन नंबरवर कळवल्यानंतर माहेश्‍वरी समाजातील मिलिंद लिहणारच्या परिचितांनी घाटीत येऊन त्याला ओळखले. मात्र, त्याच्या नातेवाइकांचा नंबर नव्हता. रात्रीच्यावेळी नगरसेवक मनोज गांगवे यांना फोन करून त्याच्या नातेवाइकांचा फोन नंबर मिळवून त्यांना कळवले. ते घाटीत आल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करून हेल्प रायडर्स परतले, तोवर रात्रीचे बारा वाजून गेले होते. 

कोण होते माहीत नाही, मात्र देवदूतांसारखेच
मिलिंदचे लहान भाऊ गणेश म्हणाले, अपघातात जखमी झालेल्या व्यक्‍तीला सहसा उचलण्याचे कोणी धाडस करीत नाही. मात्र माझ्या भावाला मोठ्या हिमतीने उचलून दवाखान्यात दाखल केले. एवढा गंभीर अपघात झालेला असताना माझ्या भावाला वेळीच घाटीत भरती केल्याने आमच्या कुटुंबावरचे फार मोठे संकट टळले. ते कोण होते आम्हाला माहितही नाही; परंतु ते आमच्यासाठी देवदूतच आहेत.

Web Title: help rider in aurangabad