"रोबोट'च्या साहाय्याने काढणार गाळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांमधील गाळ "रोबोट'च्या मदतीने काढला जाणार आहे. गाळ काढण्याचे क्‍युबिक मीटरचे दर मागविण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता. 13) झाला.

उस्मानाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्‍यांमधील गाळ "रोबोट'च्या मदतीने काढला जाणार आहे. गाळ काढण्याचे क्‍युबिक मीटरचे दर मागविण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता. 13) झाला.

सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला. तर नगराध्यक्षांनी एका वर्षाचे मानधन देण्याचे जाहीर केले. दरम्यान, अनेक दिवसांनंतर पालिकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन टाक्‍या तयार झाल्या आहेत. जुन्या टाक्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचत होता. शिवाय टाक्‍या उंचावर असल्याने त्यातील गाळ काढता येत नव्हता. दरम्यान, नवीन तंत्रज्ञानाने रोबोटच्या मदतीने गाळ काढण्यात येतो. त्यासाठी गाळ काढण्याचे रोबोटचे दर मागविण्याची मागणी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केली. टाकीमध्ये उतरून रोबोट गाळासह त्यातील पाणी काढतो. राज्यातील काही निवडक नगरपालिकांमध्ये अशा पद्धतीने रोबोट वापरून पाण्याच्या टाकीतील गाळ काढला जातो. त्याच पद्धतीने शहरातील पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्यासाठी रोबोटचे गाळ काढण्याचे क्‍युबिक मीटरचे दर मागविण्याचा निर्णय यावेळी झाला. पालिकेच्या भंगाराची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यावर नजर ठेवली जाणार आहे. शिवाय सर्वच भंगार आता एका शेडमध्ये ठेवले जाणार आहे. 

अखेर मुरूम टाकणार 
शहरात गेली 10 ते 12 दिवस पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते उखडले आहेत. त्यासाठी खड्डे मुरुमाने बुजवून घेण्याची मागणी नागरिकांतून केली जात होती. दरम्यान, मुरुमाने खड्डे बुजविण्याची निविदा ऑनलाइन मागविली होती. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरात दोन दिवसांत मुरूम टाकण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले. 

पूरग्रस्तांना नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी त्यांचे वार्षिक मानधन 36 हजार तसेच वैयक्तिक पाच हजार रुपये असे एकूण 41 हजार रुपये देण्याचे निश्‍चित केले. पालिकेतील कर्मचारी एका दिवसाचे वेतन देणार असल्याची माहिती मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी दिली. तर प्रत्येक नगरसेवकाने प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचे सर्वानुमते निश्‍चित झाले. हा सर्व निधी कोल्हापूर महापालिकेला दिला जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help of a robot Sludge in water tanks