लोकप्रतिनिधींच्या निधीतून वृक्षलागवडीसाठी मदत  

लोकप्रतिनिधींच्या निधीतून वृक्षलागवडीसाठी मदत  

औरंगाबाद : दरवर्षी होणाऱ्या वृक्षलागवडीच्या उपक्रमात सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने वन विभागातर्फे काम सुरू आहे. याच माध्यमातून वृक्षलागवडीच्या उपक्रमासाठी आमदार, खासदारांच्या पर्यावरण संवर्धनाच्या निधीतून मदत घेतली जाणार आहे. याविषयी वन विभागाच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना पत्र पाठवून ही मदत देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचा निर्णय 14 व्या वरिष्ठ वन अधिकारी परिषदेत शुक्रवारी (ता.26) घेण्यात आला. 

वरिष्ठ वन अधिकारी परिषद दर दोन ते तीन महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी वनमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतली जाते. आतापर्यंत 13 परिषदा झाल्या. गुरुवारी (ता.26) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर विविध विषयांवर चर्चा झाली. तर शुक्रवारी 33 कोटी वृक्षलागवडीसाठी आवश्‍यक असलेला निधी आणि त्यासाठी उपलब्धता यावर चर्चा झाली. यामध्ये सर्व लोकप्रतिनिधीच्या पर्यावरण संवर्धनासाठी येणाऱ्या 25 लाखांच्या निधीतून वृक्षलागवडीसाठी ठराविक निधीची मागणी केली जाणार आहे. याविषयी लोकप्रतिनिधींना पत्र पाठविण्यात येईल. बैठकीस सचिव विकास खारगे (वने), प्रधान मुख्य व वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल, प्रधान मुख्य वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी, प्रधान मुख्य वन संरक्षक शेषराव पाटील उपस्थित होते. 

ऑनलाइनवर भर 
वन विभागाच्या या परिषदेत वृक्षलागवडीबरोबर वन विभागाला ऑनलाइन करण्यासाठीच्या सर्व प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. यात जंगलात काम करणारे वनपाल त्यांचे कर्तव्य बजवतो की नाही, याचेही मूल्यमापन केले जाणार आहे. यासाठी जीपीआरएस व इतर अत्याधुनिक यंत्रणाचा वापर होणार आहे. सर्व व्यवहार ऑनलाइन करीत सर्वांच्या कामावर ऑनलाइन नजर राहील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com