मायेची उब बाळासाठी ठरली टाॅनिक : औरंगाबादेत कांगारू मातृसेवा कक्ष सुरु

gnch aurangabad
gnch aurangabad

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील नवजात शिशू विभागात कांगारू मातृसेवा कक्षाचे बुधवारी (ता. 27) औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. हे युनिसेफच्या मदतीने राज्यातील पहिले सेंटर ऑफ एक्सलेंस ठरले आहे. कांगारु मदर केअरचे इतर जिल्ह्यात प्रशिक्षण, प्रत्यक्ष मातृ सेवा आणि संशोधन येथून होणार आहे. तर या उपचार पद्धतीमुळे नवजात शिशूंचा एनआयसीयूत मिळणारी मायेची उब बाळासाठी टाॅनिक ठरणार असुन त्यामुळे एसएनसीयूतील मुक्काम कमी होईल असेही तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ठ केले.

घाटीतील प्रसुती कक्षाशेजारच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात हा कक्ष सुरु करण्यात आला. 2018 पासूनच कांगारु मदर केअरची सुरुवात घाटीत झाली होती. यासाठी एक्‍सलेंस सेंटर बनवण्याकरीता युनिसेफने 17 लाख रुपयांची साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या सभागृहात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

युनिसेफचे आरोग्यतज्ज्ञ डॉ. खानेंद्र भुईयान, उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. सुधिर चौधरी, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. वर्षा देशमुख, क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे कागीनाळकर, विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी, डॉ. रश्‍मी बंगाली, डॉ. राहूल चव्हाण, डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे, डॉ. तृप्ती जोशी, मेट्रन छाया चामले, संजीवनी गायकवाड, इनचार्ज बेबी बेग, मंजुला भंडारी, टेरीसा कोरटे, जयश्री जाधव, आषिश भालतिलक, प्रशांत बिऱ्हाडे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रिती ढिलपे तर गणेश गावडे यांनी आभार मानले. विजय वारे आदींसह परिचारीका कर्मचाऱ्यांची कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. 

मातेच्या चेहऱ्यावरील हास्य सुखावणारे
परिचारी अम्रपाली शिंदे म्हणाल्या, की प्रसुतीच्या आधिपासूनच महिला स्ट्रेसमध्ये असतात. त्यात बाळाला एनआयसीयूत भरती केल्यावर त्यांच्यासह बाळाचाही स्ट्रेस वाढलेला असतो. मात्र, कांगारु मदर केअरसाठी बाळाला कुशीत घेतल्यावर त्या मातेच्या चेहऱ्यावरील हास्य सुखावणारे असते. तर केएमसीमुळे आई बाळाचा स्ट्रेस तर जातोच शिवाय परिचारीका, डॉक्‍टरांवरील अनेक जबाबदाऱ्या कमी होतात. 

जन्माअगोदर लक्ष द्या : डॉ. येळीकर
जन्मानंतरच्या बाळाच्या वाढीवर जास्त लक्ष देण्यापेक्षा जन्माअगोदर गर्भवाढीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केले. प्रसुती वाढत आहेत. ते भुषणावह नाही. यातून कुटुंबनियोजनात आपण कमी पडत असल्याचे समोर येत असल्याचेही त्या म्हणाल्या. शिवाय बॉडीमास इंडेक्‍स वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचा सल्लाही डॉ. येळीकर यांनी दिला. 

बालमृत्यु प्रमाण घटवणे शक्‍य : डॉ. देशमुख
गेल्यावर्षी साडेतीन हजार ऍडमीशन नवजात शिशू विभागात झाले. घाटीत अठरा हजार प्रसुती होतात. त्यासाठी प्रत्येक शंभर प्रसुतीमागे चार एनआयसीयू युनिटची गरज असते. सध्या 72 एनआयसीयू युनिटची गरज आहे. त्या तुलनेत आपल्याकडची साधनसामुग्री कमी आहे. ती वाढवण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. कांगारु मातृ कक्षात मिळणाऱ्या केएमसीमुळे 50 टक्के बाल मृत्युचे प्रमाण घटवणे शक्‍य असल्याचे मत नवजात शिशू विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच केएमसी पद्धतीने माता व बाळातील बॉण्डींग वाढतो. 

कक्ष ते केअर
कांगारु मदर केअर हा सध्या कक्ष असला तरी लवकरच दोन कोटींच्या सीएसआर फंडातून कांगारु मदर केअर युनिट हे नव्या एनआयसीयूशेजारी उभे राहणार आहे. त्यासाठी शासकीय सर्व अडचणी यशश्‍वीपणे सोडवल्या असुन हा कक्ष लवकरच मोठ्या स्वरूपात दिसेल. शिवाय लवकरच मातृ दुग्ध पेढीही सुरु होणार असल्याचे डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.

काय आहे केएमसी?
केएमसी म्हणजे कांगारु मदर केअर. कांगारु हा प्राणी आपल्या पिलाला ज्या प्रमाणे सर्व अडचणींपासून संभाळण्यासाठी पोटात ठेवतात. त्याच धरतीवर नवजात शिशू कमी वजणाचे बाळ हे मातेच्या स्पर्शात आणि आईच्या उबेत राहीले तर ते लवकर बरे होते. असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. शास्त्रशुद्ध केएमसीसाठी गाऊन आणि बाळाला आईच्या छातीला बांधण्यासाठी सुरक्षीत बेल्ट तयार करण्यात आला आहे. दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळाला एक तास ते 24 तासापर्यंत केएमसी देता येते. शिवाय सलाईल, व्हेंटीलेटरवरील बाळांनाही हि सुश्रुषा केल्यास त्यांच्यात लवकर सुधारणा झाल्याचे दिसुन आले आहे. शिवाय आईचे दोन्ही हात खुले राहत असल्याने ती कामही करु शकते. 

चाळीस दिवसांत वाढले चारशे ग्रॅम वजन
अनुभव कथनात एका मातेने सांगितले, माझे सिझर झाले, बाळाचे वजन सहाशे ग्रॅम होते. त्याला एनआयसीयूत ठेवले. डाॅक्टरांनी त्याला कांगारु मदर केअर द्यायला सांगितले. मी चाळीस दिवस त्याला कांगारु मदर केअर दिली. त्याचे वजन चाळीस दिवसांनी चारशे ग्रॅमने वाढल्याने ते धोक्यातून बाहेर आले. त्यामुळे इतर मातांनीही कांगारु मदर केअर दिली तर बाळासाठी आरोग्य दायी ठरेल असा विश्वास त्या मातेने व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com