बिहारला मदत दिली; महाराष्ट्राला का नाही? विश्वजित कदम यांचा केंद्राला प्रश्न 

गणेश पांडे  | Thursday, 29 October 2020

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यावर राज्य शासन खंबीरपणे उपाययोजना करत आहे. केंद्राने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. निवडणूक लक्षात घेऊन बिहारला तातडीने मदत करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकरी केंद्राला महत्त्वाचा वाटत नाही का, असा प्रश्न कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी परभणीत गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

परभणी ः महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यावर राज्य शासन खंबीरपणे उपाययोजना करत आहे. केंद्राने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. निवडणूक लक्षात घेऊन बिहारला तातडीने मदत करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकरी केंद्राला महत्त्वाचा वाटत नाही का, असा प्रश्न कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केला. 

येथे गुरुवारी (ता.२९) झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कदम म्हणाले, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. आर्थिक पेच असतानाही केवळ शेतकरी जगला पाहिजे यासाठी राज्य शासनाने तातडीने दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे शंभर टक्के पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई त्यांच्या बॅंक खात्यावर जमा होईल. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलिस अधीक्षक जयंत मीना आदी उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या विकासाकरिता राज्य सरकारद्वारे झुकते माप दिले जाईल
परभणी ः परभणी जिल्ह्याच्या विकासाकरिता निश्चितच राज्य सरकारद्वारे झुकते माप दिले जाईल, अशी ग्वाही सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. येथील बी.रघुनाथ सभागृहात काँग्रेस समितीच्या वतीने गुरुवारी (ता.२९) सायंकाळी आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधतेवेळी ते बोलत होते.

हेही वाचा -  खासदार संजय जाधव धमकी प्रकरणाची चौकशी सुरु

जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती 
या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील, उपमहापौर भगवानराव वाघमारे, प्रा. रामभाऊ घाटगे, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, स्थायी समितीचे अध्यक्ष गुलमीर खान, गटनेते माजूलाला, माजी नगराध्यक्ष तथा महापालिका सदस्य बंडू पाचलिंग, माजी नगराध्यक्षा जयश्री खोबे, बाळासाहेब फुलारी, महापालिका सदस्य गणेश देशमुख, विनोद कदम, प्रल्हादराव अवचार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे, श्रीधरराव देशमुख, ज्येष्ठ नेत्या मलेका गफार, बाळासाहेब देशमुख, निकम, श्रीकांत देशमुख, अभय देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा -  परभणी ; अवैध वाळू वाहतूक वाद पोलिस कर्मचाऱ्यांना भोवला, एसपींनी केले बडतर्फ

शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही
याप्रसंगी आमदार वरपुडकर, माजी आमदार देशमुख व माजी खासदार रेंगे यांनी या जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप पिकांना मोठा तडाखा बसला. विशेषतः शेतजमिनी खरडून गेल्या. पिके उध्वस्त झाली. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावुन घेतल्या गेला. त्यामुळेच या पिकांचे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत, आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी श्री. कदम यांनी या जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी आपण घेऊ, तसेच सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यास सातत्याने झुकते माप देवू असा विश्वास व्यक्त केला.

 

संपादन ः राजन मंगरुळकर