पायी जाताय? थोडं थांबा! आराम, जेवण करा! जिंतूरकरांचे आदरतिथ्य

Helping Migrants at Jintur dist Parbhani
Helping Migrants at Jintur dist Parbhani

परभणी : कुणाजवळ तान्हे मुलं. कुणाच्या डोक्यावर १०-१५ किलोचे वजन. वय झाल्याने कुणाच्या शरीरात चालण्याचा त्राणच नाही. अशा अवस्थेत ते गाव जवळ करण्यासाठी शेकडो, हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करत आहेत. सारखे चालण्याने चप्पलही तुटत आहे. ओघानेच तापलेल्या सडकेवर अनवाणी पायाने, पोटात अन्नाचा कण नसताना चालण्याची वेळ अनेकांवर आली. तहान लागल्यावर प्यायला पाणी मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. पण, अशांना रस्त्यात थांबवून त्यांना सावलीत आराम करायला लावून प्यायला थंड पाणी दिले जात आहे. पोटभर खाऊ घातले जात आहे. ज्यांच्या पायात चप्पल नाही त्यांना चप्पल दिली जात आहे. शक्य असेल तर वाहनाने घरी पाठविले जात आहे. हे आशावादी चित्र आहे ते जिल्ह्यातील जिंतूर येथील. 

लॉकडाउनमुळे लाखो लोक परजिल्ह्यात, परगावात अडकून पडले. अनेकांनी रोजगार गमावला. त्यामुळे आता घरभाडे कसे देणार, किराणा कसा भरणार, यासह इतर समस्यांचा डोंगरच त्यांच्यासमोर उभा ठाकला. गावी जावे तर वाहनांची कुठलीच व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक जण पायपीट करून आपले गाव जवळ करीत आहेत. प्रवासात त्यांचे हाल होत आहेत. पायी जाणाऱ्यांना मदत केली तर आपल्यालाही कोविड-१९ ची लागण होईल, या भीतीने अनेक जण पायी जाणाऱ्या या मजुरांना बोलण्याचेही टाळत आहेत. पण, काही सदगृहस्थ त्यांची  आस्थेवाईक चौकशी करून त्यांना हवी ती मदत करत आहेत. मदत करणाऱ्यांमध्ये जिंतूर येथील योग परिवारही आहे.

असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे
 
अशी झाली स्थापना
जिंतूर पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक परमेश्वरराव काकडे यांच्या पुढाकाराने उत्तम आरोग्यासाठी योग परिवार जिंतूरची स्थापना झाली. कालांतराने आरोग्यासह निकोप समाज व्यवस्थेसाठी योग परिवारातील सदस्य जमेल तसे योगदान देऊ लागले. जांब खूर्द येथे पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत महाश्रमदान शिबिरात श्रमदान करून या परिवाराने सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले. यासह रक्तदान शिबिर, अडल्या-नडल्यांच्या मदतीला धावून जाणे हे नित्याचेच आहे.

आता कोरोना वॉरिअर्स
देशभरात अनेक जण पायी आपआपल्या गावी जात आहेत. जिंतूर परिसरातूनही पायी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे हाल पाहून योग परिवारातील सदस्यांचे मन द्रवले. सुरवातीला दत्तात्रय देशमुख हे घरून डब्बा आणून पायी जाणाऱ्यांना जेऊ घालत. नंतर संतोष कटारे, कैलास देशमुख, प्रशांत घिके, नारायणदास सोमाणी असे अनेक योग परिवारातील सदस्य पुढे आले. शिवाय समाजातील इतरांचेही सहकार्य मिळत आहे.

आता कुणी धान्य देत आहे तर कुणी स्वयंपाक करीत आहे. थकलेल्यांना एनर्जी ड्रिंक दिले जात आहे. पायी जाणाऱ्यांना आराम करता यावा, यासाठी मंडप टाकून सावली करण्यात आली आहे. लहान मुलं असेल तर त्याला दूध दिले जात आहे. सॅनिटायझर, डोके झाकण्यासाठी रुमाल, पाण्याच्या बॉटल योग परिवारातील सदस्य देत आहेत. पण, हे सगळे सुरक्षित अंतर पाळून.

एवढेच नाही तर लॉकडाउन काळात ज्येष्ठांना घरपोच औषधी आणि इतर साहित्य देणे, शेतकऱ्यांचा माल विकून देणे आदी उपक्रमही योग परिवाराच्या सदस्यांकडून सुरू आहेत; तसेच कोरोनाविषयी जनजागृती केली जात आहे. अनेक प्रवाशांना वाहनातून त्यांच्या गावी पाठविण्यात आले. नागेश अकात यांची मोलाची मदत होत आहे. नगरपालिकेचे सफाई कामगार रोज सॅनिटायझरची फवारणी करत करत आहेत. गोविंद फरतखाने, सुरेश पतंगे, विकास उपाध्ये यांच्यासह इतर अनेक जण यासाठी या सगळ्यासाठी पुढाकार घेत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com