‘या’ राष्ट्रीय माहामार्गाचे विस्तारीकर नागरिकांच्या मुळावर

File photo
File photo

नांदेड :  नांदेड जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण, रुंदीकरण, मजबुतीकरणांचे काम विविध कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून सुरु आहे. मजबुतीकरणासाठी काढलेले पर्यायी वळण रस्ते निमुळते व अरुंद असल्याने कोठारी ते धनोडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ (अ) किनवट तालुक्यात अपघात सत्र बनला आहे.

कच्च्या कामांमुळे वाहनाद्वारे उडणाऱ्या धुळीच्या लोटाने दुचाकीस्वारांचे बळी जात असून परिसरातील शेती पिकेही उध्वस्त होत आहेत. वाहनधारकांसाठी अपघातसत्र तर स्थानिकांच्या मुळावरच उठल्याचे चित्र बघायला मिळत आहे. परिणामी या महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या विरोधात कारवाईची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी केली आहे.
राज्याच्या दोन सिमांना जोडणाऱ्या नांदेड जिल्ह्यातून एकूण सात राष्ट्रीय महामार्ग मार्गस्थ होत आहे. गेल्या पाच वर्षांपासुन या महामार्गांचे काम कंत्राटदार कंपन्यांकडून सोईनुसार धिम्या गतिने सुरु आहे. शिवाय अंदाजपत्रकानुसार कामाच्या विस्तारीकरण, रुंदीकरण, मजबुतीकरणासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे लहान मोठ्या अपघातातून अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. माहूर, किनवट तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१(अ) कोठारी-धनोडा या अंतराच्या कामाचे कंत्राट शारदा कन्स्ट्रक्शन नांदेड या कंपनीकडे आहे. दरम्यान कंत्राटदार कंपनीकडून रस्ता रुंदीकरणामध्ये अंदाजपत्रकानुसार कामांना बगल देण्यात येत आहे. रस्त्यांवर पक्या मुरमा ऐवजी माती मिश्रीत मुरमाचा वापर करण्यात येत आहे. पाणी शिंपुन दबाई होत नसल्याने कच्या कामावरुन ये-जा करणाऱ्या वाहनाद्वारे धुळीचे लोट परिसरातील शेती पिकांना बाधक ठरत आहेत.

जड वाहनांचे वाढलेत अपघात
वाहनाच्या वर्दळीतून मार्ग काढणाऱ्या दुचकीस्वरांच्या डोळ्यात धुळ उडाल्याने लहान मोठ्या अपघातातून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. काम करत असताना खबरदारीच्या उपाय योजनांना कंत्राटर कंपनीकडून बगल देण्यात येत असल्याने महामार्गालगत नागरीवस्तीच्या गावखेड्यांसह परिसरातील शेतीवर धुळीचा थर साचला आहे. धुळीच्या थरामुळे जमिनीतून पाण्याच्या निचऱ्या अभावी शेती पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या शिवाय विस्तारीकरण, रुंदीकरणासाठी खोदाई कामाचे टप्पे व त्यानंतर सलग मजबुतीकरणाची पद्धत अनिवार्य असताना कंत्राटदार कंपणीने एकाच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजू लगत खोदाई केली. त्यामुळे मुळ रस्ता अरुंद झाल्याने पुरेशा रुंदी अभावी ट्रक, कंटेनर आदी जड वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. त्याचबरोबर वळण रस्ता, नाल्यावरील पूल बांधकामासाठी खोदुन ठेवलेल्या खड्ड्यांजवळ सुचना फलक नसल्याने रात्रीच्या वेळेस जड वाहनांचे अपघात वाढले आहेत. 

कंत्राटदारावर कारवाई करावी
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या निष्क्रीयता व कंत्राटदार कंपनीच्या बेजबादारपणामुळे अपघाताने परिसरातील अनेकांना अपंगत्व तर कित्तेकांना जीव गमवावा लागला अहे.  अंदाजपत्रकाला तिलांजली देवून नागरीकांच्या भवितव्याचा खेळ मांडणाऱ्या प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांसह कंत्राटदार कंपनीवर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.  

एकाच दिवशी दोन कंटनेर उलटले
महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदाई करण्यात आल्याने अरुंद रस्त्यामुळे वाईबाजार येथील जुन्या बसस्थानकाजवळ लोकवस्तीमध्ये गुरुवारी (ता.२१) अवजड कंटेनर खड्ड्यात उतरुन उलटला. तसेच महामार्गालगत उमरा तांडा येथे सिमेंट घेवून जाणारा ट्रकही गुरुवारी (ता.२१) पलटला. दरम्यान गती कमी असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला लोकवस्ती अपघातग्रस्त घुसण्यापूर्वीच पलटल्याने सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये मनुष्यहानी टळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com